किताबखाना म्हटलं की ज्यांच्या संग्रही पुस्तकं नाहीत तेसुद्धा अगदी खुलून बोलतात. यावेळी अशाच एका सेलिब्रिटी वाचकासोबत गप्पा मारल्या असता त्याच्या किताबखान्यात डोकवायची संधी मिळाली. हा कलाकार म्हणजे भालचंद्र कदम म्हणजेच सर्वांचा लाडका भाऊ कदम. ‘भाऊं’च्या किताबखान्यापेक्षा ‘भाऊ’चा किताबखाना म्हटलं की जास्त आपुलकी वाटते ना… आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या भाऊने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना त्याच्या आवडत्या पुस्तकांबद्दल सांगितलं.

नेहमी सर्वांना हसवणारा भाऊ नेमकी कोणती पुस्तकं वाचत असेल, त्याच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत कोणती पुस्तकं असतील याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही भाऊशी संपर्क साधला. यावेळी आवडत्या पुस्तकांविषयी विचारलं असता, पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकाचा उल्लेख भाऊने केला. ‘या पुस्तकामध्ये शब्दातून रेखाटलेल्या व्यक्तीरेखा, त्यांचं वर्णन, पुलंच्या लेखणीतून साकारलेलं कोकण या साऱ्या गोष्टी मला फार आवडतात’, असं भाऊ म्हणाला. ‘विविध प्रकारचे कार्यक्रम आणि स्टेज शो या साऱ्या व्यापात जरा जास्त गुंतल्यामुळे हल्ली फारसं वाचन होत नाही. पण, वाचनाविषयी म्हणायचं झालं तर मी सर्व प्रकारची पुस्तकं वाचण्याला प्राधान्य देतो’, असं भाऊने स्पष्ट केलं. व. पु. काळेंचं साहित्य आणि रहस्यमय कथा वाचण्याकडेही भाऊचा कल आहे. याविषयी सांगताना भाऊ म्हणाला, माझा किताबखाना जास्त मोठा नसला किंवा माझ्या संग्रही जास्त पुस्तकं नसली तरीही संधी मिळाल्यावर मी वाचन करतोच. मला व. पु. काळेंचं साहित्यही वाचायला आवडतं. सध्या भाऊ भैरप्पांचं एक पुस्तक वाचतो आहे.

वाचन आणि कलाकार हे एक वेगळं समीकरण आहे. किंबहुना बऱ्याचजणांना हे समीकरण उमगलं नाहीये. पण, हो वाचनाची ही सवय पुढच्या पिढीकडे वारशाच्या रुपात हस्तांतरित होते आहे हे पाहताना या कलाकारांना आणि त्यातीलच एक असलेल्या भाऊलाही दिलासा मिळतो. हल्ली म्हणे ई किताबखान्याची संकल्पना तग धरते आहे. पण, मुळात वाचनाची आवड कमी होत नाहीये, हे सर्वात महत्त्वाचं आहे असं भाऊने सांगितलं. वाचन होणं हे सर्वात महत्त्वाचं. मग ते कोणत्याही स्वरुपातील का असेना. गेल्या काही वर्षांमध्ये वाचनाच्या सवयी बदलत आहेत. नव्या संकल्पनांची ओळख होते आहे, नव्या सुविधा उपलब्ध होत आहेत. पण, त्याचा कुठेतरी फायदाच होतो आहे. त्यामुळे वाचन महत्त्वाचं आहे मग ते कोणत्याही मार्गाने का असेना असं मत भाऊ कदमनं मांडलं.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com

Story img Loader