किताबखान्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कलाकारांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकांबद्दल दिलखुलासपणे सांगितले आहे. कलाकार एकाच माध्यमामध्ये अडकून पडू इच्छित नसतो. मोठा पडदा, छोटा पडदा, रंगभूमी या सर्वच माध्यमांमध्ये काम करण्यात तो उत्सुक असतो. या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेला असाच एक अभिनेता आज किताबखानाच्या निमित्ताने आपल्या भेटीला आलाय. ‘आरजे’च्या रुपात कारकिर्दीची सुरुवात करणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आला आणि तेव्हापासून त्याने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर स्वत:चा स्वतंत्र चाहता वर्गही निर्माण केला. ‘किताबखाना’च्या निमित्ताने अभिजीतने त्याच्या वाचन सवयी, आवडींबद्दल लोकसत्ता डॉट कॉमशी संवाद साधला.
‘माझी वाचनाची सवय सध्या कमी झालीये. पण, तरीही मी अगदीच काही वाचत नाही असे नाही. गेल्या काही दिवसांपासून मी तीन पुस्तकं वाचतोय. निर्माता-दिगदर्शक करण जोहरचे आत्मचरित्रपर पुस्तक ‘अॅन अनसुटेबल बॉय’, व्यंकटेश माडगूळकर यांचे ‘जांभळाचे दिवस’ आणि मीना प्रभू यांचे ‘चिनी माती’ हीच ती तीन पुस्तक. तसं पाहायला गेलं तर मीना प्रभू यांच्या लेखनशैलीचा मी चाहता आहे. मुळात मला स्वत:ला फिरण्याची आवड असल्यामुळे प्रवासवर्णनं आणि प्रवासादरम्यानचे इतरांचे अनुभव किस्से वाचायला मला फार आवडतात, असे म्हणत अभिजीतने मीना प्रभूंच्या ‘इराणी गाथा’ या पुस्तकाचा न विसरता उल्लेख करत त्याच्या किताबखान्यातील आवडत्या पुस्तकांची सफर घडवली.
‘मी सर्व प्रकारचं साहित्य वाचतो’, असं म्हणत अभिजीने भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ कादंबरीचा आवर्जून उल्लेख केला. या कादंबरीने मला प्रभावित केल्याचे सांगत त्याने सत्य घटनांवर आधारित पुस्तकं वाचण्याच्या त्याच्या सवयींबद्दलही सांगितले. ‘पूर्वी मी बरंच साहित्य वाचलं. पण, त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने मला सत्य घटनांवर आधारित साहित्य वाचण्याची सवय लागली आणि त्याचं महत्त्वही कळलं. या प्रकारच्या लेखनातून बरीच माहिती मिळते’ असे म्हणत अभिजीतने त्याच्या लहान पण तरीही निवडक पुस्तकांच्या किताबखान्याविषयी सांगितले.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com