‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या निमित्ताने ‘सुजय’ ही व्यक्तिरेखा घराघरात पोहोचवण्यात अभिनेता सुव्रत जोशी खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला. या मालिकेसोबतच सुव्रतने त्याचा असा एक वेगळा प्रेक्षकवर्गच निर्माण केला असे म्हणायला हरकत नाही. नाटक आणि मालिकांच्या निमित्ताने तरुणाइचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या सुव्रतचा किताबखाना आज सर्वांसमोर खुला होत आहे. पुस्तकांच्या साठ्याला ‘कलेक्टिव ट्रेजर’ म्हणणारा सुव्रत त्याच्या एका आवडत्या पुस्तकाविषयी सांगत आहे….चला तर मग सुव्रतच्या या ‘कलेक्टिव ट्रेजर’मधील कोणतं पुस्तक तो बाहेर काढतो हे जाणून घेऊया……

तसं पाहायला गेलं तर माझा किताबखाना फारच मोठा आहे. पण कामाच्या निमित्ताने माझं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असल्यामुळे माझा किताबखाना विभागला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यातही काही पुस्तकांशी माझी बांधिलकी असल्यामुळे ती पुस्तकं मी माझ्यासोबतच ठेवण्याला प्राधान्य देतो. माझ्या किताबखान्यातील आवडतं पुस्तक म्हणाल तर, ‘व्हॉट मेक्स यू नॉट अ बुद्धिस्ट’ या पुस्तकाचं नाव मी घेईन. ड्जोंग्सार जॅमयँग कयान्त्से यांच्या या पुस्तकाविषयी सांगायचं झालं तर, ‘मी ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या तत्वांवर जगलो ती तत्व माझी नव्हती. कोणत्याही बिकट प्रसंगी, संकटातून जाताना त्यांना कसं भिडायचं असा प्रश्न मला नेहमीच पडायचा’. अशाच एका भावनिक आणि आर्थिक संकटातूम जाताना माझ्या हाताशी ‘व्हॉट मेक्स यू नॉट अ बुद्धिस्ट’ हे पुस्तक आलं. या पुस्तकाच्या निमित्ताने मला एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. गौतम बुद्धाने फार महत्त्वाचे असे अध्यात्मिक शोध लावले आहेत, जे शोध फारच महत्त्वाचे असून माझ्या मते ते जीवनाला एक नवा दृष्टीकोन देणारे आहेत. त्यामुळे माझ्या किताबखान्यात या पुस्तकाचं स्थानही महत्त्वाचं आहे.

पुस्तकाविषयीचे विचार मांडताना पुस्तकं जीवनदृष्टी तयार करतात हे सांगण्यास सुव्रत विसरला नाही. विविध प्रकारची पुस्तकं आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचं महत्त्वसुद्धा सुव्रतने मोजक्या शब्दांत पटवून दिले आहे. तर मग असा होता कलेक्टीव्ह ट्रेजर असलेला ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सुव्रतचा किताबखाना. पुढच्या वेळी कोणत्या सेलिब्रिटी वाचकाचा किताबखाना उघडणार हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा माझा किताबखाना…

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com

Story img Loader