‘माझा किताबखाना’ हे सदर सुरु झालं अन् विविध कलाकारांच्या मनाचा ठाव घेतलेली पुस्तकं, त्या पुस्तकांचे महत्त्व आणि कलाकारांना असलेली त्या पुस्तासाठीची ओढ या साऱ्याचा अंदाज आपल्याला येऊ लागला. किताबखान्यामध्ये यावेळी आपल्यासमोर नवा अध्याय घेऊन आली आहे अभिनेत्री वीणा जामकर. किताबखान्याची संकल्पना ऐकताच वीणाने मोठ्या उत्साहाने तिच्या आवडत्या पुस्तकाविषयीची माहिती देताना एक वेगळा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडला. विविध लेखकांच्या साहित्य वाचनाला प्राधान्य देणाऱ्या वीणा जामकरने किताबखान्यात एका पुस्तकाचा विशेष उल्लेख केला. ते पुस्तक म्हणजे ‘द सेकंड सेक्स’.
सिमोन दी ब्युवोर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या खास पुस्तकाचा अनुवाद करुणा गोखले यांनी केला आहे. याच पुस्तकाविषयी अधिक सांगताना वीणा म्हणाली की, ‘द सेकंड सेक्स’ म्हणजे स्त्री वादाचं बायबलच आहे. हे पुस्तक पहिल्या वाचनातच तुम्हाला पार हादरा देतं. स्त्रीचं रुप हे जन्मजात नसतं, तर ते घडवलं जातं. माझ्यासाठी ‘द सेकंड सेक्स’ हे आयुष्याला कलाटणी देणारं पुस्तक ठरलं आहे. असं वीणा म्हणाली. पुस्तकाच्या मूळ लेखिकेचा फेमिनिझमकडे असणारा कल पाहता तू सुद्धा फेमिनिस्ट आहेस का असे विचारले असता वीणाने ‘नाही’, असे म्हणत त्याचे स्पष्टीकरणही दिले. ‘हे पुस्तक वाचल्यानंतर स्त्रियांविषयी मनात एक प्रकारची आस्था निर्माण होते. पण, या पुस्तकातील शब्द आणि विचार हे काही पुरुषांच्या विरोधात नाहीत हेसुद्धा तितकेच खरे’, असेही वीणा म्हणाली.
‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकाविषयी सांगताना वीणाने महत्त्वाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. ‘स्त्री आणि पुरुष यांना समाजाकडून ज्या पद्धतीने शिकवण आणि वागणूक दिली जाते त्याचप्रमाणे त्यांचे विचार हे अधिक परिपक्व होत जातात. त्यामुळे कोणा एका घटकालाच याचा दोष दिला जाऊ नये’ असे मत यावेळी तिने मांडले. ‘पुस्तक वाचनाच्या सवयीविषयी सांगायचं तर कोणत्याही विषयावर होणारा वाद, संवाद, चर्चाही तितक्याच महत्त्वाच्या असतात, हे पटवून देताना आपण आपले विचार निर्भिडपणे व्यक्त केले पाहिजेत कारण त्यानंतर होणाऱ्या चर्चांतूनच आपल्याला काही गोष्टींची जाणीव होते’, असे वीणा म्हणाली.
किताबखान्यामध्ये वाचन, पुस्तकं आणि वीणा जामकर या धम्माल त्रिकुटाविषयी सांगताना वाचकांची संख्या कमी झाली नाहीये. पण, ग्रंथालयांची संख्या वाढणं नक्कीच अपेक्षित आहे असे वक्तव्यही वीणाने केले. यालाच एक पर्याय देत शाळांमधून मुलांना बक्षीस म्हणून पुस्तकं देण्याची कल्पनाही वीणाने यावेळी सुचविली. पुस्तकाच्या लक्षवेधी नावापासून ते त्यातील अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या शब्दांपर्यंतचा हा होता वीणा जामकरचा पुस्तकी अनुभव. तर मग आता पुढच्या सदरामध्ये कोणत्या सेलिब्रिटीच्या आवडत्या पुस्तकाचा उलगडा होणार हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा माझा किताबखाना.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com