लेखक म्हणून त्याची कामगिरी प्रेक्षकांपर्यंत बऱ्याच वर्षांपासून पोहोचत होती. पण, तो खऱ्या अर्थाने सर्वांच्या घराघरात पोहोचला ते म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून. त्याचा अनोखा अंदाज, संवाद कौशल्य आणि आपल्या भूमिकेला प्रभावीपणे निभावण्याची त्याची क्षमता या गोष्टींच्या बळावर त्याने पांडूची भूमिका जिवंत केली. तो अभिनेता म्हणजे प्रल्हाद कुडतरकर. ‘माईनु…… अण्णा इलंय’ असं म्हणण्याचा त्याचा अंदाज असो किंवा मग ‘कायता…. इसरलंय’ असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे विचित्र भाव असोत पांडूने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर चांगलीच पकड बनवली. एका मालिकेच्या निमित्ताने पांडू म्हणजेच प्रल्हादचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आणि आपलासा झाला. अभिनेता म्हणून सर्वांसमोर आलेला प्रल्हाद फार चांगला लेखकही आहे. अभिनय आणि लेखन क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्याचा किताबखानासुद्धा समृद्ध आहे.
मी नेहमी वाचक म्हणूनच पुस्तकं वाचतो असं म्हणत प्रल्हादने त्याच्या किताबखान्याची ओळख करुन दिली. किताबखान्यातील आवडीच्या पुस्तकांविषयी विचारलं असता त्याने मोठ्या उत्साहात व.पु. काळेंचं नाव घेतलं. याविषयी विस्तृतपणे सांगताना तो म्हणाला, ‘वपुंचं लेखन मला फार आवडतं. त्यांच्या लिखाणाची साधी- सोपी शैली आणि एकंदर आजुबाजूंच्या गोष्टींसोबत जोडता येणारा संबंध हे त्यांच्या लिखाणातील मला भावलेले महत्त्वाचे घटक. त्यामुळे त्यांचं कोणतंही पुस्तक मी कधीही वाचू शकतो.’ त्यांच्याच एका आवडत्या पुस्तकाचं नाव विचारलं असता प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच प्रल्हादने क्षणाचाही विलंब न लावता ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकाचं नाव घेतलं. ‘या पुस्तकातून एक वेगळेच वपु आपल्या भेटीला येतात. त्या पुस्तकातील काही ओळी वाचताना आपण स्वत:ला त्या ठिकाणी पाहू लागतो. त्यामुळे मला हे पुस्तक फारच आवडतं’, असं तो म्हणाला. ‘माणसाला डोळे असतात, नसते ती नजर’ ही ओळ आपल्याला विशेष भावल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे ‘व्यास हे एकच लेखक, बाकी लेखकांचे हव्यास’ ही ओळदेखील आवडल्याचं त्यांनी सांगितलं. वपुंविषयी कमालीची आत्मियता असणाऱ्या या सेलिब्रिटी वाचकाची टागोरांच्या कथांनाही तितकीच पसंती आहे. सध्याच्या घडीला सत्यजित रे यांना प्रेरणा दिलेल्या काही लघुकथांचं वाचन करण्याकडे त्याचा कल आहे.
वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…
हल्लीच्या पिढीच्या वाचनाच्या सवयीबद्दल आणि एकंदर त्यांच्या प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या आवडीनिवडीविषयी सांगत प्रल्हाद म्हणाला, ”धरसोड वृत्ती ही माणसात असतेच. याच वृत्तीवर भाष्य करणारं एक पुस्तक मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकामध्ये याची सुरेख मांडणी करण्यात आली होती. पण, सध्याच्या म्हणजेच आपल्या पिढीविषयी सांगावं तर, व्हिज्युअल गोष्टींकडे अनेकांचाच कल जास्त पाहायला मिळत आहे. त्यातही ऑडिओ बुक्ससारख्या संकल्पनांमुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. पण, त्यात गैर काहीच नाही असं मला वाटतं. पण, तरीही आपल्यासोबत एकतरी पुस्तक असावं असंच मला वाटतं. कारण, पुस्तकांमुळे आपण आपलं असं एक वेगळं विश्व निर्माण करतो, कल्पनांच्या जगात रममाण होतो.”
वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा
सध्याच्या पिढीमध्ये वाचनाची सवय कमी होतेय असं अनेकांचं म्हणणं असलं तरीही मी त्याच्याशी सहमत नाही असंसुद्धा प्रल्हादने ठामपणे सांगितलं. ‘आजच्या पिढीविषयी सांगावं तर, अभ्यास म्हणून त्यांचं वाचन होतं. पण, आवड म्हणून त्यांचं वाचन कुठेतरी कमी होत आहे. यासाठी सर्व दोष या तरुणाईचा नसून त्यामध्ये आपल्या आधीच्या पिढीचाही दोष आहे. कारण ते सध्याच्या पिढीत वाचनाप्रती आवड निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडले’, असं तो म्हणाला. मालिका आणि एकांकिका विश्वातून नावारुपास आलेल्या प्रल्हादचा किताबखाना त्याच्या लेखनशैलीइतकाच सुरेख आणि साधा आहे, अगदी सर्वांना उमगण्यासारखा. यापुढील सेलिब्रिटी वाचकाच्या आवडत्या पुस्तकांविषयी जाणून घेण्यासाठी वाचत राहा माझा किताबखाना.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com