अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. सध्या बॉलिवूडमध्ये घोंघावत असलेल्या या वादळात अनेक दिग्गजांची नावं समोर आली. कलाविश्वातील काहींनी या मोहिमेला पाठिंबा दर्शविला तर काहींनी त्यावर टीकासुद्धा केली. तनुश्री- नाना वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मात्र या विषयावर मौन बाळगताना दिसले. नानांवर झालेल्या आरोपांवर मराठी कलाकार गप्प का यावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते हिने प्रतिक्रिया दिली आहे.
‘मराठी कलाकार या विषयावर का बोलत नाहीत हे मला माहीत नाही. पण अशी एखादी घटना घडत असल्यास त्याविषयी आधी पूर्ण माहिती घ्यावी आणि मगच बोलावं असं मला वाटतं. नाना पाटेकर यांनी तनुश्रीसोबत असभ्य वर्तन केलं असेल की नाही यामध्ये न पडता मी म्हणेन की कुठल्याही स्त्रीबाबत असं काही झालं तर ते चुकीचंच आहे. दोषी व्यक्ती कोणीही असो, कितीही मोठा असो तरी त्याला समर्थन दिलं तर चुकीचंच ठरेल,’ असं मत अनिताने मांडलं.
वाचा : ‘राधिका मसाले’च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..
#MeToo या मोहिमेचं समर्थन करत अशा पद्धतीची मोहीम व्हावी आणि ती यशस्वी ठरावी असंदेखील अनिता म्हणाली. या मोहिमेअंतर्गत गेल्या पंधरा दिवसांत आलोक नाथ, साजिद खान, रजत कपूर, कैलाश खेर, अभिजीत भट्टाचार्य, पियूष मिश्रा, विनोद दुआ, श्याम कौशल, विकास बहल, सुभाष घई यांसारख्या कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.