माणसाला लोकशाही व्यवस्थेत सगळे अधिकार आणि हक्क आहेत, पण आपले जीवन स्वेच्छेने संपवण्याचा अधिकार मात्र त्याला नाहीए. अगदी एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून असली आणि ती बरी होण्याची कसलीही शक्यता नसली, किंवा त्या व्यक्तीचं जगणं स्वत: त्या व्यक्तीसह जवळच्या नातलगांनाही त्रासदायक झालं असलं तरी मृत्यू येईपर्यंत तिला सक्तीनं जगावंच लागतं. कारण त्या व्यक्तीची सुटका करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाहीए. या नकोशा झालेल्या जगण्याच्या सक्तीविरुद्ध अनेक जण वेळोवेळी न्यायालयात गेले आहेत. के. ई. एम.मधील अरुणा शानभाग प्रकरण हे याचं ज्वलंत उदाहरण. पण न्यायालयं या गोष्टीला मुळीच परवानगी देत नाहीत. कदाचित या अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो, हा न्यायालयाचा मुद्दा ग्राह्य धरला तरीही अशी काही दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरणं समाजात आढळतात, की ज्यात त्या व्यक्तीला स्वेच्छामरण देणंच उचित असं डॉक्टरांसह सर्वांनाच वाटत असतं, पण तसं ते तिला देता येत नाही. सुनीताबाई देशपांडे यांनी आपल्या आत्मकथनात आपल्या आईच्या शेवटच्या आजारात आपल्या मनात येऊन गेलेल्या अशाच काहीशा विचारांचं सुतोवाच केलेलं आहे. असो. हे नमनाला घडाभर तेल ओतण्याचं कारण नुकतंच रंगभूमीवर आलेलं संजय जमखंडी लिखित-दिग्दर्शित नाटक… ‘मी v/ s मी.’

अनिश नावाच्या तरुणाला त्याच्या समस्यांनी ग्रस्त आयुष्याला कंटाळल्याने ते संपवायचं आहे. त्यासाठी त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्यास आणि तो फसल्यास तो गुन्हा ठरून आपल्याला तुरुंगवास होणार. म्हणजेच ज्या आयुष्याला आपण कंटाळलोय ते आणखीनच बदतर होणार. म्हणूून त्याने न्यायालयात याबद्दल दाद मागितली आहे. त्याची ही केस वृत्तपत्रांतून, माध्यमांतून चांगलीच गाजतेय. अशात एके दिवशी त्याला एक फोन येतो. फोन करणारी व्यक्ती आपण डॉक्टर असल्याचं सांगते आणि त्याला त्याच्या या समस्येतून आपण सोडवू अशी त्याला हमी देते. मी तुला हवा असलेला मृत्यू देईन असं ती व्यक्ती त्याला सांगते. पण त्या बदल्यात त्यानंही आपल्यासाठी एक काम करावं असं त्याला सुचवते… दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या आईला मृत्यू देण्याचं! अनिशला सुरुवातीला आपली कुणीतरी फिरकी घेते आहे अशीच समजूत होते. पण ती व्यक्ती त्याला पटवून देते की, त्याची आई एका गंभीर दुर्धर आजारानं खरोखरीच पीडित आहे आणि तिची जगण्याची जराही इच्छा नाहीए. पण त्याचे वडील जबरदस्तीने तिला जगवताहेत. ती दोघं एका वृद्धाश्रमात आहेत; जे त्याच्या वडलांनीच सुरू केलंय. अनिशचा आधी या कहाणीवर विश्वासच बसत नाही. पण त्या माणसाने सगळे तपशील पुरवल्यावर आणि तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी… वृद्धाश्रमात गेल्यावर त्याला त्यावर विश्वास ठेवावाच लागतो.

अनिश त्या वृद्धाश्रमात त्या व्यक्तीचे वडील असलेेल्या डॉक्टर हेगडे यांचा साहाय्यक म्हणून सेवेत दाखल होतो. त्यांची पत्नी अंथरुणाला खिळून आहे. डॉक्टर हेगडे तिची सर्वतोपरी सेवा करताहेत. तिची हौसमौज करताहेत. तिला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याकामी साहाय्यक म्हणून ते अनिशला हाताशी घेतात. त्याला मात्र ती आपल्या आयुष्याला कंटाळलीय का, हे जाणून घेण्यात रस असतो. तो तसं डॉक्टरांना विचारतोही. ते त्याला ती एकदम खूश असल्याचं सांगतात. तसाच काहीसा अनुभव त्यालाही येतो. अर्थात तो त्यांच्या मुलाला आपला हा अनुभव सांगतो. पण तो ते खरं मानायला तयार नाही. त्याच्या दृष्टीने आई आयुष्याला कंटाळलेलीच आहे. पण वडील जबरदस्तीने ती खूश असल्याचं नाटक करताहेत असं तो म्हणतो. त्याच्या आईलाही अनिश त्याबद्दल विचारतो. पण ती बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने ती काय बोलतेय हे त्याला कळत नाही. डॉक्टर हेगडे तिला घेऊन काश्मीरला जाण्याचा बेत आखतात. अनिशलाही ते मदतीला बरोबर घेऊन जातात. तिथे अनिशने तिला विषारी डोस देऊन तिचं आयुष्य संपवावं असं तिचा मुलगा त्याला सांगतो. बेताचा तपशीलही ठरतो. तो तसा प्रयत्न करतोही… परंतु त्याचा तो बेत फसतो. डॉक्टर हेगडेंच्या ते लक्षात येतं. ते त्याला फैलावर घेतात. तेव्हा तो हे तुमच्या मुलानंच मला करायला सांगितलं होतं असा खुलासा करतो. आणि तुमचं मुलाशी का वैर आहे असा सवाल करतो…

अर्थात डॉक्टरही अनिशला तू आयुष्याला इतका का कंटाळलायस असं विचारतात. तो कारण सांगतो. त्यावर ते त्याला एक सल्ला देतात. तोही त्यांना तसाच सल्ला देतो…स्वेच्छामरणाच्या मुळाशी त्याचं जे कारण असतं ते किती तकलादू आहे हे त्यातून सिद्ध होतं.

लेखक-दिग्दर्शक संजय जमखंडी यांनी विषय तर विचारप्रवृत्त करणारा निवडलाय, पण त्याची मांडणी मात्र त्यातल्या गुंतागुंतीला अजिबातच हात न घालणारी आहे. त्यात अत्रे, प्रबोधनकार, सावरकर, खरे वगैरेंचा जो एक आभासी प्रसंग दाखवलाय त्याचं नाटकात नेमकं प्रयोजन काय हेच कळत नाही. दुसरं म्हणजे अनिश आणि डॉक्टर हेगडे अनुक्रमे आपले वडील आणि मुलगा यांना शेेवटी फोन लावतात आणि त्यांचे परस्परांसंबंधीचे गैरसमज दूर होतात… इतकंच जर त्यांच्या टोकाला जाण्याचं कारण असेल तर ते फारच पपलू आहे.

त्यासाठी स्वेच्छामरण वगैरेचा घाट घालण्याचं काहीच कारण नव्हतं. असो. या त्रुटी असल्या तरी नाटक आपल्याला पकडून ठेवतं, हेही खरंय. माणसाचा अहंकार त्याच्या दु:खाला कसं कारण बनतो, गैरसमजातून माणसं एकमेकांपासून कशी तुटत जातात हे यातून ठसतं. हे खरं बघता मानवी भावभावनांचं नाटक आहे. त्यातले तिढे, पीळ माणसाचं आयुष्य कसं नरकवत करू शकतात हे बहुधा यात लेखक-दिग्दर्शकाला दाखवायचं असावं. ते साध्य होतं. पण स्वेच्छामरणाशी त्याची जोडलेली नाळ मात्र पटत नाही. लेखक-दिग्दर्शक एकच असल्याने संहितेत जे म्हणायचं आहे ते प्रयोगात बिनचूक संक्रमित होतं. पण संहितेतल्या त्रुटी मात्र तशाच राहिल्या आहेत. त्याची सांधेजोड जमलेली नाही.

संदेश बेद्रे यांनी यातली विविध नाट्यस्थळं यथार्थपणे उभी केली आहेत. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून प्रसंग उठावदार केले आहेत. अभिषेक खणकर यांचं गीत प्रसंगानुकूल. समीर म्हात्रे यांचं संगीत नाट्यपरिपोष करणारं आहे. तृषाला नायक यांची वेशभूषा आणि राजेश परब यांची रंगभूषा पात्रांना बाह्यरूप प्रदान करते.

क्षितीश दाते यांनी अनिशचं आयुष्याला कंटाळलेला, ते संपवू पाहणारा तरुण ते डॉक्टर हेगडेंच्या सान्निध्यात आल्यावर त्याच्यात होत गेलेलं परिवर्तन उत्कटतेनं व्यक्त केलं आहे. चक्रमछाप वाटणारे डॉक्टर हेगडेंच्या भूमिकेत ऋषिकेश जोशी फिट्ट बसले आहेत. त्यांचं वागणं, बोलणं, हातवारे यांतून त्यांच्या अतरंगीपणाची खात्री पटते. शिल्पा तुळसकर यांनी व्हीलचेअरला खिळलेली, आपल्या दुर्धर आजाराचं सावट घेऊन वावरणारी, पण तरीही जगू इच्छिणारी किरण हेगडे उत्तम साकारली आहे. महेश सुभेदार (खरे), दिनेश सिंह (प्रबोधनकार) आणि चिन्मय पटवर्धन (बुकी) यांनी आपली कामं चोख केली आहेत.