पी के शर्मा (अनुपम खेर), अक्षयकुमार (अजय सिंग), जोगिंदर (राजेश शर्मा) आणि इकबाल (किशोर कदम) अशा चौघेजण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून गैरमार्गाने पैसे करणारे, नफाखोरी करणारे, भ्रष्टाचारी राजकारणी, धनदांडगे उद्योगपती, जवाहिरे यांसारख्या लोकांना लुटतात. कधी सीबीआय, कधी प्राप्तिकर विभाग अशा सरकारी खात्यांचे अधिकारी असल्याची बतावणी करून धनदांडग्यांच्या घरी छापा घालणे आणि सगळी संपत्ती लुटून नेणारी ही चौघांची टोळी असते. मला कोणीही पकडू शकत नाही अशी मिजास असलेल्या अजय सिंगला खरोखरीचा सीबीआय अधिकारी वसीम खान (मनोज बाजपेयी) भेटतो तेव्हा काय घडते त्याभोवती चित्रपट आहे.
पी के शर्मा हा मध्यमवयीन कुटूंबवत्सल माणूस आहे. त्याला खूप सारी अपत्ये आहेत. चंदीगढमध्ये राहणाऱ्या या शर्माच्या मोठय़ा मुलीचे लग्नही नुकतेच झाले आहे. चित्रपटाचा नायक अर्थात अजय सिंग हा तसे पाहिले तर सडाफटिंग आहे परंतु मुंबईत तो राहत तिथल्या कॉलनीतल्या एका मराठी तरुणीवर त्याचं प्रेम आहे. नोकरी मनासारखी मिळत नाही म्हणून आपण अशा ‘इण्टेलिजेण्ट’ पद्धतीने चोऱ्या करतो असे अजय सिंग तिला सांगतो. त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तीही हे मान्य करते. चौघांपैकी इक्बाल आणि जोगिंदर यांचेसुद्धा सर्वसामान्य कुटूंब आहे. चोर असले म्हणून काय झाले आम्ही लुटतो तर धनदांडग्या, नफेखोरी करणाऱ्या लोकांनाच असे या चौघांचे ‘तत्वज्ञान’ आहे. दिग्दर्शकाने हे अतिशय नेमकेपणाने दाखविल्यामुळे प्रेक्षकही या चोऱ्यांमध्ये जणू सामील होत जातो.
मुळात या कथानकामध्ये नायिकेची अजिबात गरज नव्हती असे वाटेलही. परंतु, अन्य तिघांप्रमाणेच अजय सिंगला गडगंज पैसा कुणासाठी कमवायचा याचे कारण प्रेक्षकाला पटविता यावे म्हणूनच प्रिया चव्हाण (काजल अग्रवाल) हिची व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने आणली आहे. बॉलीवूडचा फॉम्र्युला, सर्वसामान्य प्रेक्षकांची विचार करण्याची चौकट लक्षात घेऊन आपल्याला जे नेमकेपणाने दाखवायचे आहे, नमूद करायचे आहे ते करावे असा विचार दिग्दर्शकाने केला असावा. नाटय़पूर्ण उत्कंठावर्धक कथानक नेमकेपणाने सादर करताना त्याला १९८७ साली घडलेल्या मुंबईतील बडय़ा ज्वेलर्सचे दुकान लुटून नेले होते ही सत्य घटना चित्रपट करण्यामागची दिग्दर्शकाची प्रेरणा आहे. सुरुवातीलाच पडद्यावर १९८७ सालच्या घटनेचा उल्लेख येतो आणि चित्रपट लगेच सुरू होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा