आज मनोरंजनोत्तम ब्लॉकबस्टर चित्रपट जितक्या मोठय़ा प्रमाणावर येत आहेत, तितकेच मनोरंजनयुक्त आशयघन चित्रपटही दाखल होत आहेत. चित्रपटातील ‘कॉपी कॅट कल्चर’ मागे पडून संकरित रूपात आजचा चित्रपट मोठय़ा प्रमाणावर तयार होत आहे. अमेरिकी दिग्दर्शक क्वेन्टीन टेरेटिनोच्या शैलीबाज चित्रपटांचा प्रभाव शाबूत असलेल्या भारतीय उदाहरणांसह टेरेन्टीनोच्या ताज्या चित्रपटाबद्दल..
साधारण १९९९ ते २००८ पर्यंत भारतीय सिनेमा हा वैविध्यपूर्ण घुसळणीतून जात होता. परकीय कल्पना थेट उचलत इथले चित्रकर्ते गुन्हेगारी विषयावर कुठलाही ब्लॉकबस्टर हितेच्छू चित्रपट बनवत होते. अद्ययावत सिनेवाहिन्या, डीव्हीडीचा काळाबाजार यांच्यातून दारोदारी-गल्लोगल्ली वैश्विक सिनेमाचा रतीब पोहचत होता. इथे सुमार सिनेमांची सद्दी असणाऱ्या काळात भांबावलेल्या प्रेक्षकवर्गाचा डोळा आदळणाऱ्या सिनेपर्यायांमुळे बदलायला लागला होता. अन् त्यातून ब्लॉकबस्टरइतकेच नवसमांतर सिनेमांना स्वीकारण्याचीही पूर्वपीठिका तयार होत होती. अमेरिकी दिग्दर्शक क्वेन्टीन टेरेन्टिनोच्या सिनेमांची इथे उतरविलेली थेट रूपांतरे आणि जगभरच्या त्याच्या अनुयायी चित्रकर्त्यांच्या सिनेमांची उचलेगिरी यावर काही काळ आपला बॉलीवूडी सिनेमा तग धरून होता. सगळीच उचलेगिरी लोकप्रिय झाली नसली, तरी त्यांचा प्रवाह आटत नव्हता. दुबई, थायलंडमध्ये घडणारी गँगस्टर्सची कथानके आणि दरोडय़ांच्या चित्र-विचित्र कथांच्या सिनेमांचा कंटाळा यावा इतक्या सिनेपुनरावृत्त्या आपल्या सिनेमांमध्ये १९९९ते २००५ या काळात घडल्या. तिकीटबारीवर आदळूनही गुन्हेगारीपटांचा जगभरात स्वीकारला गेलेला टेरेन्टिनोकृत ‘फॉम्र्यूला’ भारतीय सिनेमा सोडायला तयार नव्हता. यादरम्यान मल्टिप्लेक्स रिलिझसाठी तयार झालेला भारतीय इंग्रजी सिनेमाचा त्रोटक ट्रेण्डही संपुष्टात आला. मात्र २००४ नंतरच्या दिग्दर्शकांच्या नव्या फळीने परकीय प्रभाव न नाकारता संकरित चित्रपट बनवायला सुरुवात केली आणि भारतीय सिनेमा काहीअंशी बदलाच्या दिशेने वळला.
काही अंशी यासाठी की आपल्याकडे चित्रपटांची समीक्षा कितीही टीकात्मक झाली तरी वाईट सिनेमा निव्वळ बिग स्टारक्रेझच्या वेडावर टीका, समीक्षण वा परीक्षण यांना न जुमानता ‘१०० कोटी क्लब’चा सदस्य बनू शकतो. अन् समीक्षकांनी कितीही चांगले म्हटले, तरी न नावाजलेल्या कलाकारांच्या चांगल्या चित्रपटाच्या माथी ‘कल्टहीट’चा शिक्का लागतो.
निव्वळ गुन्हेगारीपटांबाबत बोलायचे झाले तर ‘फिर हेराफेरी’, ‘जॉनी गद्दार’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’ यांच्यापासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत कल्टहीट सिनेमांची मोठी यादी करता येऊ शकेल. प्रेमपटांची नावे घ्यायची, तर ‘देव डी’पासून ‘इश्कियाँ’, ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटापर्यंत बदलाची स्थानके आहेत. या संकरित सिनेमाला १०० कोटींच्या क्लबात जायला मिळाले नसले, तरी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात मात्र बऱ्यापैकी स्थान मिळविले.
ताजी संकर उदाहरणे…
इथल्या चित्रकर्त्यांच्या नव्या पिढीने थेट उचलेगिरी न करता जागतिक सिनेमाचा प्रभाव स्वीकारत निर्मिती केली, तेव्हा भारतीय चित्रपट खऱ्या अर्थाने बदलला. थायलंड-दुबई किंवा पारंपरिक मुंबईमध्ये घडणारी सिनेमाची कथा निमशहरी भागांमध्ये, आडगावांमध्ये घडू लागली. ‘ओय लक्की, लक्की ओय’, ‘गुलाल’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘उडान’, ‘लव्ह शव्ह दे चिकन खुराना’, ‘फुकरे’, ‘गुड्म्डू रंगीला’, ‘बदलापूर’, ‘पिकू’, ‘एनएच टेन’, ‘मसान’ , ‘तितली’, ‘बुलेट राजा’ अशा १०० कोटी क्लबच्या बाहेर असणाऱ्या सिनेमांना प्रेक्षकांनी बऱ्यापैकी पसंती दिली. पण आपला सिनेमा सर्वार्थाने चांगला करण्यासाठी सिनेसाक्षरांचे प्रमाण आज आहे, त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. ते होत नाही तोवर दर महिन्याआड जीर्ण-शीर्ण नायकांच्या सुमार सिनेमांचा १०० कोटी क्लब आपले अस्तित्व टिकवून ठेवील.
गेल्या दोन वर्षांत आपल्याकडे दोन उत्तम संकरित सिनेमे दाखल झाले. त्यांच्या नावावरून ते का पाहावे, असे वाटत असले, तरी टेरेन्टिनोच्या प्रभावाला अंगिकारून देशी मातीतील निर्मिती कशी करता येऊ शकेल, याचा उत्तम वस्तुपाठ या चित्रपटांनी घालून दिला. पहिला चित्रपट आहे कंगना राणावत अभिनीत ‘रिव्हॉल्व्हर रानी.’ दिग्दर्शक साई कबीर श्रीवास्तव यांचा हा चंबळच्या खोऱ्यात घडणारा चित्रपट उघडपणे टेरेन्टिनोच्या ‘किल बिल’ चित्रपटातील उमा थर्मनला समोर ठेवून घडविलेला आहे. मात्र भारतीय राजकारण, समाजकारण, बॉलीवूड यांच्या सद्य:स्थितीची अचूक जाणीव असलेली त्यातील ब्लॅक कॉमेडी हे त्याचे वैशिष्टय़ं. वेस्टर्नपटांतील काऊबॉयसारखी यातील कंगना राणावतची व्यक्तिरेखा असंख्य सांस्कृतिक धक्के देऊ शकते. याशिवाय जागतिकीकरणानंतर बदलल्या देशातील, गावांतील जगण्याची, भाषेची बदललेली स्थिती या चित्रपटामधून अचूकरीत्या अभ्यासायला मिळू शकते. गावातील मूठभरांना मिळालेली नवश्रीमंती, किडलेले स्थानिक राजकारण यांभोवती गुंफलेली ही अनपेक्षित प्रेमसूडकथा आजच्या सिनेबदलाची सारी वैशिष्टय़े सामावून घेणारी आहेत. हॉलीवूडचे वेस्टर्नपट, कोरियन सूडपट आणि जागतिक सिनेमांतील, खुद्द बॉलीवूड सिनेमांच्या नौटंकी प्रकारांचे कैक संदर्भ या वेगवान चित्रपटात आहेत. ‘हँसी तो फसी’ ,‘गुड्डू रंगीला’, ‘सुलेमानी किडा’ या चित्रपटांप्रमाणेच नावावर जाऊन टाळला गेला असल्यास आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे.
नावावरून आणि ‘ननामी’ अभिनेत्यांचा सहभाग असल्यावरून ब्लॉकबस्टरमध्ये रमणाऱ्या बहुतांश प्रेक्षकांकडमून टाळला गेलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ‘मेरठीया गँगस्टर.’ झिशान काद्री याने ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाच्या पटकथेद्वारे आधीच नाव कमावले होते. वासेपूरमधील गडद पाश्र्वभूमी आणि गुन्हेगारी विनोदाचा एक तिकडम प्रकार ‘मेरठीया गँगस्टर’ चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. मेरठ शहरात खंडणी आणि लुटमारीच्या सत्य घटनांना टेरेन्टिनोच्या सिनेमांतील िहसाचाराशी जोडत याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
टेरेन्टिनोच्या पहिल्या ‘रिझव्हॉयर डॉग्ज’ चित्रपटातील सुरुवातीच्या नायकांच्या टेबलवरील चर्चेच्या प्रसंगाची हुबेहूबशी पुनरावृत्ती उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर करून दाखवत हा चित्रपट सुरू होतो. चित्रपटांत गुन्हे, मारधाड, गोळीबारी यांचा अतिरेक आहे. शहरांमधील वाढत्या सुशिक्षित बेकारीचा प्रश्न आणि आजच्या सुशिक्षितांची मनोवस्था अचूक टिपण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. अपहरण, खंडणी, दरोडे, गुन्ह्य़ांची वाढती मात्रा आणि भरीला अनपेक्षित लखलखीत विनोद यामुळे गेल्या वर्षांतील उत्तम निर्मितीपैकी या चित्रपटाची नोंद होऊ शकेल.
संकरित हेटफूल एट…
क्वेन्टीन टेरेन्टिनोच्या चित्रपटांनी जगभरच्या सिनेमांवर टाकलेला पगडा अद्भुत आहे. ब्रिटन, भारत, थायलंड, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया या चित्रपट जगभर पोहोचविणाऱ्या चित्रराष्ट्रांमधील दशकभराच्या सिनेमांमध्ये तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परावर्तित झालेला आहे. आपल्याकडे सुरुवातीला फक्त चित्रकर्ते त्याचे चाहते होते. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र त्याचे खूप कमी चित्रपट भारतात प्रदíशत होऊनही सिनेमाप्रेमींना त्याचे महत्त्व ज्ञात आहे. पण गंमत म्हणजे टेरेन्टिनोच्या प्रत्येक सिनेमाचे वेगळेपण हे जगभरातील त्याच्या आवडीच्या चित्रपट संकल्पनांना, टीव्ही मालिकांना एकत्रित करून तयार झालेल्या कडबोळ्यात असते. मार्शल आर्ट, वेस्टर्न सिनेमा, जुने-नवे अज्ञात सूडपट, टीव्ही मालिका आदी अनेक संदर्भानी त्याने आपला सिनेमा बनविला. त्याचा नवा चित्रपट ‘हेटफूल एट’ही त्याच्या कडबोळे प्रकाराला अपवाद नाही.
वेस्टर्नपटाचा बाज घेऊन हा चित्रपट दीर्घ रहस्यकथाच मांडतो. ही कथा आहे अमेरिकेतील यादवी युद्ध घडून गेल्यानंतरच्या काळातील एकमेकांना जोडणाऱ्या विविध प्रकरणांची. याचे पहिले प्रकरण सुरू होते मार्कस वॉरन (सॅम्युएल एल जॅक्सन) आणि जॉन रूथ (कर्ट रसेल) या दोन बाऊंटी हंटर्सच्या भेटीपासून. पैकी वॉरन इनाम जाहीर झालेल्या तीन कैद्यांचे मृतदेह सोबत घेऊन आलेला असतो. तर जॉन रूथ हा डेझी डॉमरेग्यू (जेनिफर जेसन ली) नावाची भलेमोठे इनाम असलेली जिवंत कैदी फाशी देण्यासाठी नेत असतो. दोघांचा अंतिम टप्पा एकच असल्याने ते एकत्र प्रवास करतात. या प्रवासामध्ये त्यांच्यात फाशी तडीस नेऊ शकणारी आणि इनामाची रक्कम मिळविण्यात पुढे महत्त्वपूर्ण वाटा बजावू शकणारी आणखी एक व्यक्ती दाखल होते. बर्फवादळामुळे ते एका हॉटेलसदृश घरात थांबतात. तेथे आधीच अडकलेले काही लोक असतात. प्रकरणे जशी सरकू लगतात, तशी त्या घरात एकमेकांमध्ये संशय, क्रौर्य, घातपात, खून आणि सूड यांची वादळे तयार होतात. घडणाऱ्या घटना चित्रपटाला रहस्योत्कट मुलामा देतात आणि या माणसांची भलतीच रूपे समोर येऊ लागतात.
चित्रपटाला यादवी युद्धानंतरच्या अमेरिकी पुरुषी मानसिकतेचा संदर्भ आहे. ही मानसिकता पुढे १०० वर्षे वर्णद्वेष आणि स्त्रीद्वेषाच्या रूपाने अस्तित्वात राहिली होती. कृष्णवर्णीय मार्कस वॉरन या बाऊंटी हंटरला येथील कथेत कृष्णवंशीय असूनही महत्त्व आहे, ते त्याला खुद्द राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने लिहिलेल्या वैयक्तिक पत्राची प्रत त्याच्याजवळ आहे त्यामुळे. मात्र हे महत्त्वही तिरस्कार रूपातूनच इतरांकडून व्यक्त होते. हाच प्रकार कैदी डेझीच्या क्षणोक्षणी होणाऱ्या पाणउताऱ्यातून आणि तिला हवे तसे मारण्यातून होतो. संदर्भ आणि संवादाला अमेरिकी इतिहासाचाच भावूक आधार तपशिलात असला, तरी तो खोलात जाणून घेण्याची इथे गरज लागत नाही.
चित्रपटात टेरेन्टिनोचा लाडका अंगावर येणारा अतिरंजीत हिंसाचार आणि रक्ताचा सडा आहे. माणसांच्या तऱ्हेवाईकपणाचा कळस आहे. त्याच्या आधीच्या सिनेमांना जोडणारे कथाविकसनाचे आकर्षक तंत्र आहे.
गेली २३ वर्षे विषय वेगवेगळे असले, तरी त्यातील समान तत्त्व काय असेल, तर त्याच्या चित्रपटाचे संकरित रूप. जसा ‘रिझव्हॉयर डॉग्ज’ पारंपरिक दरोडेपट नव्हता, ‘पल्प फिक्शन’ पारंपरिक गुन्हेगारीपट नव्हता. ‘किलबिल’ पारंपरिक सूडपट नव्हता, ‘इनग्लोरियस बास्टर्ड्स’ पारंपरिक युद्ध इतिहासपट नव्हता. चित्रसंकर होईल इतके जोडलेले सिनेदाखले आणि संदर्भ त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. वेस्टर्न सिनेमांची पाश्र्वभूमी घेऊन हेटफूल एटला वेगळ्या, स्वतंत्र गोष्टीचा मुलामा येथे देण्यात आलेला आहे.
बॉलीवूडच्या चित्रपटांची भविष्यातील स्थिती आजच्या चित्रसंकरामुळेच आशादायी बनलेली आहे. जागतिक सिनेमांचे संदर्भ स्थानिक पातळीवरील विषयांमध्ये रिचवून चित्रपट धीटपणे हाताळणारे चित्रकर्ते पुढे येत आहेत. या मिश्राळलेल्या सिनेमाचे सर्वार्थाने उठून दिसणारे वेगळेपण हे त्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढवीत आहेत. मोठय़ा प्रसिद्धी तंत्राने मोजक्या कलाकार केंद्रित चित्रपटांच्या बॉलीवूडवरील वर्चस्वाला या संकरित सिनेमाने सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. आगामी काळात त्या सुरुंगांचे खरे परिणाम दिसून येतीलच.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com