अलीकडे लावण्यांच्या कार्यक्रमांना नागर रंगभूमीवर लोकमान्यता मिळाली असली तरी अस्सल तमाशा बाजाची वगनाटय़ं त्या प्रमाणात मुख्य प्रवाहात होताना दिसत नाहीत. ‘विच्छा माझी पुरी करा’ आणि ‘गाढवाचं लग्न’चा अपवाद करता नागर रंगभूमीवर गाजलेलं तिसरं वगनाटय़ आठवायला डोकं खाजवावं लागतं; यावरूनच काय ते समजा! ही दोनच वगनाटय़ं पुन: पुन्हा रंगभूमीवर येत राहतात. त्यापल्याड नव्या वगनाटय़ाला हात घालायला कुणीही धजावत नाही. या पाश्र्वभूमीवर अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभागाच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे पहिले सादरीकरण असलेल्या द. मा. मिरासदारलिखित आणि डॉ. मंगेश बनसोड दिग्दर्शित ‘मी लाडाची मैना तुमची’ या वगनाटय़ाचा प्रयोग पाहायला मिळाला आणि तबियत खूश झाली. थोडासा पसरट; परंतु वगनाटय़ाचा अस्सल गंध असलेला हा प्रयोग विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या पेलला.
वगनाटय़ाआधी गण, गवळणी, बतावणी, लावणी असा साग्रसंगीत पूर्वरंग असतो. त्यातही कलाकारांचा कस लागतो. ‘मी लाडाची मैना तुमची’मध्ये हे सारं त्यातल्या पारंपरिकतेसह आणि वर्तमान घटना-प्रसंगांवरील चुरचुरीत शेरेबाजीसह अनुभवायला मिळालं. उधळ्या नवरा-बायकोच्या संसाराची चित्तरकथा द. मा. मिरासदारांनी यात सांगितली आहे. राजाकडे हुजऱ्या असलेला सोकाजी आणि राणीची लाडकी दासी असलेली त्याची नर्तिका बायको मैना हे दोघंही ‘खाओ, पिओ, ऐश करो’ पंथाचे वारकरी! साहजिकच तुटपुंज्या पगारात त्यांचं भागणं कठीणच! मग याची उधारी कर, त्याच्याकडून कर्ज घे अशी उधारउसनवारी आलीच. त्यापायी कर्जाचा डोंगर आणि थकीत उधारीचा इमला उभा राहायला कितीसा वेळ लागणार? स्वाभाविकपणेच देणेक ऱ्यांचा तगादा आणि त्यांच्या धमक्यांनी त्यांचा पिच्छा न पुरवला तरच नवल! सोकाजी निदान राजाच्या आगेमागे करण्यात मग्न असल्यानं त्याच्या मागचा ससेमिरा तेवढा काळ तरी नसे. पण मैनेला सगळ्यांना तोंड द्यावं लागे. कधी चुकून सोकाजी त्यांच्या तावडीत सापडलाच तरी तो घरात तोंड लपवून दडे आणि मैनेलाच त्यांच्यापुढे करी. मैना त्यामुळे कावून गेली होती. पण त्यांच्या उधळपट्टीत मात्र जराही खंड पडत नसे. सोकाजी बायकोला खर्चाला आवर घालायला सांगे. तर मैना उलट त्यालाच जिभेचे चोचले कमी करायचा सल्ला देई. पण अति झालं आणि डोक्यावरून पाणी वाहायला लागलं. तेव्हा मग सोकाजी अािण मैना तगादेवाल्यांना नाना क्लृप्त्या योजून, त्यांच्यात आपापसात कलागती लावून त्यांना पळवून लावू लागले. पण हे तरी किती काळ चालणार? एक ना एक दिवस ही मंडळी त्यांचा गळा धरणारच! यावर सोकाजी एक शक्कल लढवतो. आपण दोघांनी मरण्याचं नाटक करायचं आणि राजा व राणीकडून सहानुभूतीपोटी पैसाअडका, धनधान्य आणि कपडेलत्त्याची मदत उकळायची! या प्लॅननुसार मैना राजाकडे जाऊन सोकाजी हार्ट अॅटॅकने गेल्याचं धाय मोकलून सांगते. राजाला विधवा मैनेची दया येते आणि तो प्रधानाला तिला दीड लाख रुपये, अन्नधान्य आणि कपडालत्त्याची मदत करण्याचे आदेश देतो. अशाच रीतीनं सोकाजीही राणीकडे जाऊन तिची लाडकी दासी मैना अचानक देवाघरी गेल्याचं रडत भेकत सांगतो. तेव्हा बायकोविना पोरक्या झालेल्या सोकाजीला राणी एक लक्ष रुपये, धनधान्य आणि कपडेलत्ते देण्याचं फर्मान काढते.
आपल्या अक्कलहुशारीमुळे अकस्मात झालेल्या या धनलाभानं सोकाजी आणि मैना खूश होतात. पण राजा आणि राणी आपल्या समाचाराला कुणाला तरी पाठवण्याची भीती त्यांना वाटते. तेव्हा काय करायचं?
राजा आणि राणी एकमेकांना त्यांच्या प्रिय नोकरमाणसांचं निधन झाल्याचं वर्तमान सांगतात तेव्हा त्यांच्यात खडाजंगी होते. राणी म्हणते- ‘मैना गेली’ राजा म्हणतो- ‘सोकाजी गेला’ शेवटी खरं-खोटं करण्यासाठी दोघंही जातीनं त्यांच्या घरी जातात. तेव्हा..
द. मा. मिरासदारांनी अरबी भाषेतील एका सुरस आणि चमत्कारिक कथेवर हे वगनाटय़ बेतलं आहे. ८० च्या दशकात निळू फुले आणि राम नगरकर या जोडीनं हे धमाल वगनाटय़ चांगलंच गाजवलं. यातली फडकती गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली आहेत. आशुतोष वाघमारे यांनी त्यांना या प्रयोगात कडकडीत चाली लावल्या आहेत.
या प्रयोगाचे दिग्दर्शक डॉ. मंगेश बनसोडे हे तमाशाकलेचे अभ्यासक असल्यानं गावाकडचा तमाशा आणि वगनाटय़ाचे सादरीकरण यांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. खुल्या आकाशाखाली तंबूत होणारा तमाशा आणि वगनाटय़ाचं अस्सल वातावरण त्यांनी तंबूच्या प्रवेशद्वारावरील झगमगीत रोषणाई, लावणी सादर करतानाची अदा असलेले मैनेचे रंगवलेले पोस्टर्स वगैरे गावाकडची तमाशाफडाची चैतन्यमय वातावरणनिर्मिती केली होती. प्रत्यक्ष प्रयोगाला सामोरे जाण्यापूर्वी प्रेक्षकांची त्या मानसिकतेत शिरण्याची तजवीज याद्वारे त्यांनी केली होती. पारंपरिक गणाला फाटा देऊन त्यांनी महाराष्ट्रातील महामानवांना वंदन करणाऱ्या आधुनिक गणाने या वगनाटय़ाची सुरुवात होते. पुढची गवळण व बतावणी नेहमीप्रमाणेच रीतीला धरून असली तरी त्यात वर्तमान घटना घडामोडींवर चिमटे काढणारी शेरेबाजी अधूनमधून पेरलेली होती.
मुख्य वगनाटय़ाचे सादरीकरण कसलेल्या कलावंतांनी सादर करावे इतके सफाईदार होते. सोकाजीची सहज उत्स्फूर्तता आणि मैना आणि राणीची शैलीदार अदाकारी यांच्या मेळातून छान गंमत निर्माण करण्यात आली होती. मैनेचा तोरा आणि फटाकडेपण यांचा पुरेपूर वापर करण्याबरोबरच अन्य कलाकारांच्या छोटय़ा छोटय़ा लकबी, हशे वसूल करण्याच्या जागा यांचा विचार दिग्दर्शकानं त्यातल्या निरागसतेसह केलेला जाणवला. शेठजींचं बेरकेपण आणि लाळघोटेपा, जोडीला भरपूर सारा मूर्खपणा यांच्या मिश्रणातून या पात्राचं वेगळेपण छान ठसवलं गेलं होतं. पात्रनिवडीतच दिग्दर्शकाचं अर्ध काम सोपं झालं होतं. जी पात्रं थोडीशी कच्ची होती त्यांना खुबीनं इतरांमागे झाकण्याची चतुराई निश्चितच स्तुत्य. अर्थात पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची ही प्रस्तुती होती हे लक्षात घेता प्रयोग अत्यंत सफाईदार आणि व्यावसायिकतेच्या जवळ जाणारा झाला, हे आवर्जून नमूद करायला हवं. नाटय़स्थळं दर्शवणारे पाश्र्वपडदे, दर्शनी भागात नृत्यांगनांच्या अदांची पोस्टर्स वगैरेतून आपण खरोखरच तमाशा फडाच्या प्रयोगाला आलो आहोत असं वाटत होतं. याचं श्रेय नेपथ्यकार विशाल पवार यांना द्यायला हवं. लावणीसम्राज्ञी छाया खुटेगावकर यांनी यातली लावणीनृत्ये बहारदार बसवली होती. मुलींनीही ती जाणकारीनं सादर करायचा प्रयत्न केला. उलेश खंदारे यांनी रंगभूषेतून आणि संध्या साळवे यांनी वेशभूषेतून तमाशाचा अस्सल बाज व्यवस्थित दृगोचर होईल हे पाहिलं. आशुतोष वाघमारे यांनी लावणीचा अभिप्रेत ठसका संगीतातून, चालींतून अचूक आणला. दीपक थोरात आणि हितेश राणे यांनी प्रकाशयोजनेतून नृत्यांत बहार आणली.
सगळ्या कलाकारांची फर्मास कामं हे या वगनाटय़ाचं आवर्जून सांगावंसं वैशिष्टय़! अगदी छोटय़ा छोटय़ा भूमिका असलेल्यांनीही आपलं काम प्रामाणिकपणे केल्याचं जाणवलं. सोकाजी झालेले प्रसाद वाघमारे यांना त्या भूमिकेची नस अचूक सापडली होती. त्यांचा टायमिंग सेन्स आणि संवादफेकीतला गोळीबंदपणा लाजवाब. त्यात विलक्षण बोलक्या चेहऱ्याची साथ लाभल्यावर तर काय विचारूच नका! अमृता तोडरमल यांनी मैनेचा लटका, झटका आणि लाडिकपण इतकं मस्त टिपलंय, की ती खरोखरीची मैनाच वाटावी! पुष्कर सराड यांनी मारूनमुटकून बनल्यासारख्या फद्या राजाचं बेअरिंग धमाल वठवलंय. अंकुश वाढवे यांनी आपल्या शरीरयष्टीचा शेटजी साकारताना उत्तम उपयोग केला आहे. विनोदाच्या बारीक बारीक जागा त्यांनी छान काढल्या आहेत. सीमा भालेकरांची शैलीदार राणी लक्षवेधी, धम्मरक्षित रणदिवेंचा प्रधानही उल्लेखनीय. सुदेश जाधवांची गवळणीतली मावशी फटाकडी असली तरी त्यांनी विनोदनिर्मितीनंतर हशाच्या जागा कशा एन्जॉय करायच्या, हे तंत्र जरा घोटवायला हवं. विहंग भणगे, सिद्धार्थ बाविसकर, चैतन्य सरदेशपांडे, ओंकार पाटील, संतोष जढाळ, नम्रता इंगळे, नमिता चव्हाण, विशाल पवार, क्षमा वासे अशा सर्वानीच आपापली कामं सर्वस्व ओतून केली.
एका मस्त मजेदार वगनाटय़ाचा अनुभव या प्रयोगानं दिला यात काहीच संशय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा