शिमगोत्सव म्हणजे कोकणवासियांसाठी अगदी हळवा कोपरा. फाक पंचमीच्या दिवशी पहिल्या होळीने कोकणात खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरुवात होते. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव… कोकणातील चाकरमानी नोकरी-व्यवसायासाठी कितीही लांब गेलेला असला तरी शिमग्यानिमित्त तो आपल्या गावी जातोच म्हणजे जातोच. अगदी सामान्य माणसापासून ते कलाकार मंडळी आपल्या गावी शिमग्यासाठी हजेरी लावतात.
अशीच एक अभिनेत्री तिच्या कोकणातल्या गावी शिमग्यानिमित्त गेली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे (Megha Dhade). ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने तिच्या कोकणातल्या गावामधील शिमगोत्सवाची खास झलक शेअर केली आहे.
मेघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमार्फत तिने तिच्या गावच्या शिमगोत्सवाची खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. शिवाय या व्हिडीओसह तिने असं म्हटलं आहे की, “ओढ म्हणजे काय ते गावी गेल्याशिवाय कळत नाही आणि शिमगा म्हणजे काय ते कोकणात आल्याशिवाय कळत नाही. एरव्ही देव देव्हाऱ्यात असतात त्यांना भेटायला देवळात जावं लागतं, पण शिमग्याला मात्र आमचे देव आम्हाला भेटायला आमच्या घरी येतात. म्हणूनच खूप खास असतो आमचा हा कोकणातला शिमगोत्सव.”
यापुढे तिने “आयुष्यात एकदा तरी नक्की हा विलक्षण अनुभव तुम्हीही घ्या. पण तूर्तास या व्हिडिओतून आमच्या कोकणातल्या शिमगोत्सवाची एक झलक खास तुमच्यासाठी” असं म्हणत देवाच्या पालखीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मेघा स्वत: देवाची पूजा करताना दिसत आहे. मनोभावे पूजा केल्यानंतर मेघा देवापुढे नतमस्तक होते. देवाच्या पालखीशिवाय तिच्या भव्य घराची झलकही या व्हिडीओमधून दिसत आहे.
मेघाने शेअर केलेल्या या शिमगोत्सवच्या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच तिच्या साधेपणाचं कौतुकही केलं आहे, त्याचबरोबर अनेकांनी त्यांना व्हिडीओ व गावची पालखीची परंपरा आवडल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मेघाच्या कामाबदलद बोलायचे झाले तर सध्या ती झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत तिच्याबरोबर प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी करण, आशिष कुलकर्णी हे कलाकारसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत.