ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. वृध्दापकाळाने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली. सुलोचना यांच्या निधनामुळे संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात सुलोचना यांनी श्रोत्यांना आपलसं केलं.
आणखी वाचा – ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन
आजही सुलोचना चव्हाण यांची लोकप्रियता कायम आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे सुलोचना यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिने सुलोचना यांचा जुना फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वहिली.
मेघा म्हणाली, “अत्यंत दुःखद. मंत्रमुग्ध करणारा ठसकेबाज, काळजाला भिडणारा आवाज आज कायमचा बंद झाला. महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी, महाराष्ट्राच्या पाश्वगायिका सुलोचना ताई चव्हाण या वयाच्या ९२व्या वर्षी सोडून गेल्या.”
“तुमच्या गायलेल्या लावण्यांवर आम्ही लावणी कलावंत जागलो. तुम्ही गायिलेल्या या अनमोल खजिन्याला आम्ही सुखरूप ठेऊ ताई. तुम्हाला शेवटच्या क्षणी भेटता आलं नाही याची खंत कायम राहील. ताई माफ करा. भावपूर्ण श्रद्धांजली.” मेघाने भावूक होत सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.