बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रएला यांची चर्चा रंगली आहे. गॅब्रएला प्रेग्नंट असून तिचं डोहाळजेवण करण्यासाठी अर्जुनची पत्नी मेहर उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वामध्ये या तिघांच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्जुन आणि मेहर यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच गॅब्रएलाचं बेबीशॉवर करण्यात येणार असून मेहर या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहे. गॅब्रएलाच्या बेबीशॉवरची जबाबदारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर सोपविण्यात आली असून मेहर या कंपनीचा एक भाग आहे. त्यामुळे गॅब्रएलाच्या डोहाळजेवणामध्ये मेहरचं महत्वाचं योगदान असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. मुंबईमधील ब्रांदा येथे खासगीरित्या हा कार्यक्रम होणार आहे.
गॅब्रएलाच्या प्रेग्नंसीविषयी मला कोणतीही तक्रार नाही, असं काही दिवसांपूर्वी मेहरने सांगितलं होतं. दरम्यान, ‘मिस इंडिया’चा किताब पटकावणाऱ्या मेहर जेसिया आणि अर्जुननं वीस वर्षांपूर्वी विवाहगाठ बांधली होती. पण, गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद वाढू लागल्यानं अखेर विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय या दोघांनी घेतला. या निर्णयानंतर अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे वळाला असून तो गेल्या काही काळापासून गॅब्रएलाला डेट करत आहे.