>> कुलवंतसिंग कोहली
‘‘वो इन्सान नहीं, फरिश्ता है।’’
‘‘इनकी आवाजा ख़ुदा की आवाजा है।’’
‘‘त्यांचा स्वभाव जितका निर्मळ, तितकाच त्यांचा आवाजही निर्मळ!’’
‘‘किती मुलायम आवाज आणि किती डिग्निफाइड वागणं! क्वचितच कोणी असं गात असेल आणि वागत असेल!’’
ही सारी वाक्यं फक्त एकाच व्यक्तीच्या बाबतीत लागू पडतात. ती व्यक्ती म्हणजे महान गायक मोहम्मद रफी! खुदा का पाक बंदा!
माझ्या सुदैवानं रफीसाहेबांचा स्नेह मला अनेक र्वष लाभला. मी त्यांच्या घरी जात-येत असे. ते फार क्वचित माझ्याकडे आले असतील. पण त्यांच्या आवाजानं आधी माझ्या मनावर गारूड केलं. लहान वयातच त्यांच्या आवाजातील फिल्मी, गरफिल्मी गीतं मी ऐकत होतो. आधी आताच्या पाकिस्तानातील रेडिओ स्टेशनवरून आणि नंतर भारतातील रेडिओ स्टेशनवरून. त्यांची गाणी ऐकताना नेहमी देहभान विसरून जात असे मी. ते जेव्हा जेव्हा देवाची आर्त आळवणी करत, तेव्हा त्यांचा आवाज प्रत्यक्ष परमेश्वरापर्यंत पोचत असणार असंच मला वाटे. मी अत्यंत सश्रद्ध माणूस आहे. माझा वाहेगुरूंवर आणि ईश्वरावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे देवापर्यंत नेणारी कोणतीही रचना मला मोहवून टाकते. रफीसाहेबांचा आवाज देवापर्यंत आपल्या भावना पोचवणारं माध्यम आहे असं मला नेहमीच वाटतं. माझा मित्र मनोजकुमार एकदा मला म्हणाला होता, ‘‘पुट्टपूर्तीच्या श्री सत्यसाईबाबांच्या विनंतीवरून मी रफीसाहेबांना घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. सत्यसाईबाबांच्या सांगण्यावरून रफीसाहेबांनी एक भजन गायलं. रफीसाहेब त्यांच्या नेहमीच्या तन्मयतेनं गाऊ लागले. त्यावेळी त्यांच्या शरीराभोवती निर्माण झालेला ‘ऑरा’ श्री सत्यसाईबाबांनी मला दाखवला आणि ते मला म्हणाले, मी रफीसाहेबांना गायला सांगितलं, कारण त्यांच्या गायनात मला ईश्वराचा आवाज ऐकू येतो.’’
मलाही नेहमी तसंच वाटत आलंय. रफीसाहेबांचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचाच आवाज! ते मूळचे पंजाबी असूनही आमच्या बसाखी कार्यक्रमात कधी सामील झाले नव्हते, हे आमच्या लक्षात आलं. तेव्हा मी प्राणसाहेबांना म्हणालो, ‘‘प्राणजी, रफीसाहेब आपल्या बसाखीत गायला आले पाहिजेत. त्यांनी एक तरी चक्कर मारली पाहिजे.’’ प्राणसाहेब म्हणाले, ‘‘त्यांना मी विचारून सांगतो.’’ दुसऱ्या दिवशी प्राणसाहेबांनी मला फोन केला- ‘रफीसाहेब अमुक एका स्टुडिओत उद्या रेकॉìडग करणार आहेत. त्यांना तुम्ही बरोबर तीन वाजता भेटा. वेळ पाळा. ते वक्तशीर आहेत.’ आम्ही खूश झालो. लहानपणापासून मी ज्यांची गाणी ऐकत लहानाचा मोठा झालो, त्यांना मी आज भेटणार होतो. आम्ही बसाखीचे सर्व संयोजक दिलेल्या वेळेच्या थोडंसं आधीच स्टुडिओत पोहोचलो. बरोबर तीन वाजता रफीसाहेब आम्हाला भेटायला आले. आम्ही आमची ओळख करून दिली आणि त्यांना बसाखीचं निमंत्रण दिलं. रफीसाहेब त्यांच्या मुलायम आवाजात अगदी हळुवारपणे म्हणाले की, ‘‘प्राणसाहेबांनी मला याबद्दल सांगितलं आहे. मी नक्की येतो. किती वाजता येऊ ते सांगा.’’ बसाखीचा कार्यक्रम रात्री साडेआठला सुरू होणार होता. मी त्यांना म्हणालो, ‘‘कार्यक्रम रात्री साडेआठच्या सुमारास सुरू होणार आहे. तुम्ही साडेनऊला या. लगेचच तुमचा कार्यक्रम सुरू करू. तुमच्या आधी शम्मी कपूर त्याच्या काही गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. तीही तुमचीच गाणी आहेत.’’ रफीसाहेब नम्रपणे म्हणाले, ‘‘मी बरोबर साडेनऊला येतो. मी जेवायला थांबणार नाही. मी माझं सादरीकरण झालं की काही वेळानं निघून जाईन. चालेल ना?’’ आम्ही कशाला ‘नाही’ म्हणतोय! इतका महान गायक येतो म्हणाला हेच खूप होतं आमच्यासाठी. मग आम्ही त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला साथीदार कोण हवे आहेत, ते सांगाल का? आम्ही त्यांना बोलावतो.’’ रफीसाहेब म्हणाले, ‘‘अहो, तशी काही गरज नाहीये. मी हार्मोनिअम वाजवीन, बाकीची तुम्ही जी वादक मंडळी बोलावली असतील ती मला चालतील. उगीच आपल्या समाजाचे पसे का खर्च करता? आपला कार्यक्रम आहे. काळजी करू नका. सगळं नीट होईल.’’
पहिल्यांदा पंजाब असोसिएशनच्या कार्यक्रमात गायला येणाऱ्या या महान भारतीय गायकानं किती सहजपणे सारं आपलंसं केलं होतं. बसाखीच्या दिवशी रफीसाहेब बरोब्बर साडेनऊला आले. त्यांना घेऊन आम्ही स्टेजजवळ गेलो. शम्मीचं नृत्य सुरू होतं. त्याला माहीत होतं- की रफीसाहेब येणार आहेत आणि गाणारही आहेत. त्यानं लगेच रफीसाहेबांना स्टेजवर बोलावलं. त्यांना तो हळूच म्हणाला, ‘‘आप गाईये, मैं लाइव्ह परफॉर्मन्स करता हूँ।’’ शिस्तशीर रफीसाहेबांना हे थोडंसं ऑकवर्ड वाटलं. ते असं अनप्लॅन्ड काही करत नसत. पण तो शम्मी होता. त्यांचा आवडता स्टार होता. शम्मीला त्यांचाच आवाज सूट होत असे. शम्मी त्यांना पुढे म्हणाला, ‘‘यार, आप को और मुझे स्टेजपर ये सारे लोग पहली बार देख रहे है। और यहाँ लिपसिन्क की कोई जरुरत नहीं है। तुम्ही गा, मी धमाल नाचतो. मजा येईल.’’
रफीसाहेबांनी ते मानलं. आणि पुढचा अर्धा तास रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. आमची बसाखी एकदम सजली-धजली. आपला कार्यक्रम संपवून रफीसाहेब न थांबता निघून गेले. आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत रफीसाहेब नित्य बसाखीला येत असत आणि मजा करून जात असत. म्हणजे ते गात असत व लोक त्या गाण्यांचा आनंद लुटत असत. रफीसाहेबांनी आमच्याकडून कधीही पसे घेतले नाहीत. स्वत:च्याच खर्चाने येत व जात. नेक इन्सान!
संयम हा अत्यंत महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे होता. काय करावं, किती पुढे जावं याचा अगदी अचूक विवेक त्यांच्याकडे होता. रफीसाहेब खूप हळुवार बोलत. त्यांची पत्नी मला एकदा म्हणाली होती की, ‘‘घरातही ते इतके हळू बोलतात की आपले कान त्यांच्या ओठाजवळ नेऊन ऐकावं लागतं.’’ ते मुलांना अजिबात ओरडत नसत. पण त्यांचा धाक मात्र होता. सबंध आयुष्य फिल्मी दुनियेत काढलेलं असलं तरीही रफीसाहेब अजिबात ‘फिल्मी’ नव्हते. त्यांच्या घरात फिल्मी वातावरण बिलकूल नव्हतं. त्या बेगडी वातावरणापासून त्यांनी आपल्या मुलांना कायम दूर ठेवलं. सच्च्या मुसलमानाचं ते घर होतं. रफीसाहेबांनी कधीही कुठल्याही व्यसनाला आयुष्यात स्पर्श केला नाही. त्यांना त्याचा तिटकाराच होता. त्यांना नेहमी निमंत्रणं देऊनही ते फार क्वचित आम्ही दिलेल्या पाटर्य़ाना येत असत. खूपच आग्रह केला तर ते त्यांच्या फियाट गाडीतून येत, ड्रायव्हरला सांगत- ‘गाडी वळवून आण, तोवर मी येतोच..’ आणि खरोखरच ते त्या पार्टीत फक्त तोंड दाखवून लगेच निघून जात. दुसऱ्याला दुखावणं त्यांना ठाऊक नव्हतं. ते लग्नांनाही फार कमी जात. ऋजुता, साधेपणा ही विशेषणे केवळ त्यांच्याकरताच बनली असावीत.
‘पाकिजा’च्या वेळचा एक अनुभव सांगतो. त्याला गुलाम महंमद यांनी संगीत दिलं होतं. पण पिक्चर रिलीज व्हायच्या वेळेस त्यांचं निधन झालं आणि मग नौशादसाहेबांनी त्याचं पाश्र्वसंगीत पूर्ण केलं होतं. त्यातलं एक गाणं- ‘चलो दिलदार चलो, चांद के पार चलो..’ कमाल अमरोहीसाहेबांना त्यातील अंतऱ्यात काही बदल करून हवा होता. त्यांनी रफीसाहेबांना विनंती केली. मीही तिथं होतो. रफीसाहेबांनी नम्रपणे त्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘‘गुलाम महंमदसाहेबांनी आठ-दहा वर्षांपूर्वी हे गाणं रेकॉर्ड केलंय. त्यावेळचा माझा आवाज वेगळा होता. अधिक जवान आणि मुलायम होता. आता थोडा भरडा झालाय. आपण तसं नको करू या.’’ त्यांच्या या विनम्रतेनं मी अवाक् झालो! त्यांची ही नम्रता व स्वत:कडे पाहण्याचा त्यांचा वास्तववादी दृष्टिकोन मला थक्क करून गेला. पण कमाल अमरोही आणि नौशादसाहेबांनी खूपच आग्रह धरला. अखेरीस ते तयार झाले. ठरलेल्या वेळी ते आले आणि दहा मिनिटांत त्यांनी कमालजी व नौशादसाहेबांना जशी हवी तशी जागा गाऊन रेकॉर्ड करून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या आवाजाच्या पोतात अजिबात फरक पडला नव्हता. आम्ही त्यांना त्यांचे पसे द्यायला गेलो, तर ते म्हणाले, ‘‘या गाण्याचे पसे मी पूर्वी घेतले आहेत. एकाच गाण्याचे कोणी दोनदा पसे घेतं का? तसं केलं तर ती व्यवसायाशी प्रतारणा होईल. शिवाय आज गुलाम महंमदसाहेबही हयात नाहीत. आजचं हे काम त्यांच्या स्मृतीस अर्पण करू या. आणि रेकॉर्ड करणारे नौशादसाहेबही माझे गुरूच आहेत.’’ आजच्या व्यवहारी दुनियेत अजिबात न बसणारा हा माणूस होता.
रफीसाहेब माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. पण माझा व त्यांचा खूप जवळचा स्नेह होता. रफीसाहेब आताच्या पाकिस्तानात जन्मले. त्यांचा जन्म अमृतसर जिल्ह्यतल्या कोटला सुलतानसिंग गावचा. त्यांना घरात ‘फिको’ असं लाडानं म्हणत असत. ते सहसा नॉस्टॅल्जिक होत नसत. पण आमची मुळं एका भागातली असल्यानं ते माझ्याशी बोलत असत. त्यांच्या हळुवार बोलण्याचा माझ्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. मीही तसाच हळुवारपणे बोलू लागलो. त्यांच्यात लहानपणापासून फकिरी वृत्ती होती. आठ-नऊ वर्षांच्या रफीसाहेबांना लहानपणी एका फकिराच्या गाण्यानं मंत्रमुग्ध केलं होतं. ते दररोज त्या फकिराच्या मागे मागे जाऊन त्याचं गाणं ऐकत. एके दिवशी त्या फकिरानं त्यांना विचारलं, ‘‘बेटा, तुम मेरे पीछे पीछे क्यूँ आते हो?’’ छोटा मोहंमद म्हणाला, ‘‘मालूम नहीं। लेकीन आप की आवाज मुझे आप के पीछे खींच ले आती है। आप को सुनता हूँ तो लगता है, अल्लाह की आवाजा सुनता हूँ। ये कैसे होता है?’’ फकिरानं त्यांना उत्तर दिलं, ‘‘कुछ नहीं बेटा, जब आप गाते हो तो सिर्फ सूर को मत गाना.. त्यातल्या आशयाच्या खोलीपर्यंत जा. गात असलेला तो शब्द तू स्वत: हो. तुझ्या आवाजातून आपोआपच अल्ला प्रकट होईल.’’ मला हे सांगत असतानाही रफीसाहेबांच्या डोळ्यांत त्या फकिराविषयीची कृतज्ञ भावना स्पष्टपणे दिसत होती.
रफीसाहेब दरवर्षी बसाखीला येत आणि कार्यक्रम करून निघून जात. एका बसाखीला मलाही लवकर जायचं होतं. मी रफीसाहेबांबरोबर निघालो. पापाजींसाठी आमची गाडी ठेवली आणि मी रफीसाहेबांच्या गाडीतून निघालो. प्रीतमजवळ आल्यावर मी रफीसाहेबांना म्हणालो, ‘‘तुम्ही नेहमी न जेवता घरी जाता. आज तुम्हाला मी सोडणार नाही. आज जेवायचंच.’’ पण ते ऐकेनात. शेवटी हळूच म्हणाले, ‘‘सच कहूँ क्या कुलवंतजी, जब तक मैं घर नहीं जाऊंगा, आप की भाभी खाना नहीं खाएगी। आम्ही रात्रीचं जेवण एकत्रच जेवतो. अनेक वर्षांचा शिरस्ता आहे हा.’’ मी त्या सद्गृहस्थाकडे पाहतच बसलो. यावर काय बोलावं ते सुचेना. पण मी आग्रहच धरला, ‘‘भाभीजींना मी फोन करून सांगतो. आज तुम्ही इथंच जेवा. आज त्या मला क्षमा करतील. मैं माफी का या सजा का हकदार हूँ।’’ रफीसाहेबांनी पटकन् माझे हात धरले. ‘‘माफी या सजा ऐसा कुछ मत कहिये। चलीये, आज आप के यहाँ खाना खाते है।’’ ‘‘तुम्हाला काय आवडेल?’’ असं मी विचारलं, तर ते म्हणाले, ‘‘दालगोश्त आणि गरमागरम पराठे खिलवा.’’ ‘‘बस्स? आणखी काहीतरी सांगा की! आपणा पंजाबी लोकांना असं एवढंच खाणं कसं पुरेल?’’ ‘‘ठीक आहे मग. पालक गोश्त बनवा.’’
त्या दिवशी आमचं किचन धन्य झालं. कधीही कुठंही न जेवणारे रफीसाहेब आमच्याकडे मनापासून जेवले. दुसऱ्या दिवशी भाभीजींचा फोन आला. ‘‘तुमच्या जेवणाची रफीसाहेब खूप स्तुती करत होते. ते जितकं जेवले असं म्हणतात, तितकं खरंच जेवले असतील तर आश्चर्य आहे. ते घरी कधीच एवढं खात नाहीत.’’ मला अतिशय आनंद झाला.
मी त्यांच्या घरी अनेकदा जात असे. कधी पंजाब असोसिएशनच्या कामासाठी, कधी एखाद्या चित्रपटाच्या गाण्याच्या सीटिंगसाठी. आमच्या ‘संगीता पिक्चर्स’च्या प्रत्येक चित्रपटात रफीसाहेबांचं एक तरी गाणं असेच. त्यांच्या घरी जायचं म्हणजे आनंदपर्वणीच असे. ते स्वत: जातीनं पाहुण्यांची खातिरदारी करत. प्रत्येक आल्या-गेल्याची त्यांचं घर जिव्हाळ्यानं वास्तपुस्त करत असे. त्यात मनापासूनची आपुलकी असे. अत्यंत सभ्य व सुसंस्कृत वागणं होतं त्यांच्या घराचं. घरात पाऊल टाकतानाच तुम्हाला कळतं, की हे घर तुमचं स्वागत करतंय की त्याला तुम्ही नको आहात!
रफीसाहेबांचा बंगला प्रशस्त होता. बाहेरच्या बाजूला गाण्याची सीटिंग रूम होती. तिथं संगीतकार मंडळी रफीसाहेबांना आपल्या गीतांच्या चाली ऐकवत. आणि हे सारं खानदानी शिस्तीत होत असे. रफीसाहेब दरवाजाकडे पाठ करून बसलेले असत. एक पाय दुमडून गुडघ्यावर घेत व हाताच्या बोटांनी पायावर ठेका धरत. ती त्यांची शैली होती. रफीसाहेब आपली चाल नेमकी समजून घेत. त्याचा व्यवस्थित सराव करत. कितीतरी वेळा रिहर्सल करत. त्या काळात रेकॉìडग करणं खूप मुश्कील असे. एखादं वाद्य जरी चुकीचं वाजलं तरी अख्खं गाणं पुन्हा रेकॉर्ड करावं लागे. प्रथितयश गायक अशा वेळी जो वादक चुकला असेल त्याच्याकडे रागानं पाहत. रफीसाहेब मात्र अशा वेळी कधीच चिडत नसत. ते हसून त्या चुकलेल्या व्यक्तीस दिलासा देत. शांतपणे पुढच्या टेक्ची वाट पाहत आणि आपलं काम नेमकेपणानं पूर्ण करत. ते गाताना त्या गाण्यात स्वत:च्या अॅडिशन्स कधीही करत नसत. ते म्हणत, ‘संगीतकाराने अख्खी इमारत आधी मनात उभी केलेली असते. आपण आपल्या कल्पनेनं त्यात का बदल करायचे? आपल्या बदलामुळे ती इमारत कदाचित ढासळली गेली तर..? तर तो त्या चालीवर व संगीतकाराच्या कामगिरीवर अन्याय ठरेल.’ सहगायकांनी तशा अॅडिशन केल्या तरी ते थोडे डिस्टर्ब होत. पण अधिक प्रतिक्रिया देत नसत. संगीतकारानं एकदा रेकॉìडग फत्ते सांगितलं की ते अल्लाचे आभार मानत व निघून जात. त्यांनी कधीही आपली फी इतकी इतकी आहे असं सांगितलं नाही, की कोणाकडे एक छदाम मागितला नाही. स्वत:च्याच विश्वात वावरणारा तो एक मस्त आशक फकीर होता. लहानपणी त्या फकिरानं सांगितलेली वाक्यं ते कधीही विसरले नाहीत. त्यांच्या आवाजात पहाटेच्या दंवबिंदूंची कोवळीकता होती आणि प्राजक्ताच्या फुलांची कोमलताही. पण या दंवबिंदूंना व प्राजक्ताच्या फुलांना न लाभलेली एक गोष्ट त्यांच्या आवाजाला लाभली होती, ती म्हणजे- अमरत्व!
ksk@pritamhotels.com
शब्दांकन : नीतिन आरेकर
(कुलवंतसिंग कोहली यांनी लिहीलेला हा मूळ लेख ‘लोकरंग’ पुरवणीमधील ‘ये है मुंबई मेरी जान!’ या सदराअंतर्गत १२ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झाला होता)