“काल ‘कोथरूड सिटीप्राइड’ला सकाळी १० च्या शोला ‘द काश्मीर फाइल्स’ बघितला. माझी पत्नी व मी आम्ही दोघं होतो. हल्ली मला सिनेमागृहांत जायची भीती वाटते, ती आजूबाजूला कोण येईल आणि कसं वागेल या धास्तीमुळं… ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात तसं शेजारी २०-२५ वयाची एक तरुणी येऊन बसली. पलीकडं तिचा हिरो/बॉयफ्रेंड/मित्र/नवरा यापैकी कुणी तरी एक होता. आम्ही बसल्यावर थोड्या वेळानं ते येऊन बसले. त्यामुळं आम्हाला जागा एक्स्चेंज करायला स्कोप नव्हता. तसं बरंही दिसलं नसतं. मात्र, त्या मुलीच्या हातात पॉपकॉर्नचा जंबो पॅक बघूनच माझ्या मस्तकाची शीर तडतडायला लागली. सिनेमा सुरू झाल्याबरोबर त्या मुलीची रनिंग कमेंटरी सुरू झाली. ती एक तर आवाज करून खात होती आणि ती जवळपास प्रत्येक संवादाला सबटायटल दिल्यासारखं तिच्या शेजारच्या हिरोला काही तरी सांगत होती. अशा वेळी सिनेमाकडं कॉन्सन्ट्रेशन करणं अवघड होतं. मी त्या मुलीला आधी मराठीत, नंतर तिला मराठी कळत नाही हे कळल्यावर हिंदीतून शांत बस असं सांगून पाहिलं. त्यावर शांत बसणं तर सोडाच, उलट ‘अब क्या आप की परमिशन लेनी पडेगी क्या पॉपकॉर्न खाने को’ आणि ‘आप ने क्या थिएटर खरीद लिया क्या’ असं तिनं मलाच सुनावलं. मला सिनेमा बघायचा होता, म्हणून मी दुर्लक्ष केलं. एरवी भांडणं ठरलीच होती.” हा अनुभव आहे पुण्यातील सिनेरसिक श्रीपाद ब्रह्मे यांचा.
या अनुभवानंतर ब्रह्मेंची प्रतिक्रिया होती की अशा या पब्लिकचं काय करायचं? कशाला येतात हे लोक सिनेमा बघायला? ‘सिनेमा कसा बघावा?’ किंवा ‘कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेताना पाळावयाची पथ्ये’ या विषयावर कुणी शिकवत नाही का? इतका इन्टेन्स सिनेमा बघताना किमान शांतता पाळण्याचं सौजन्य प्रेक्षक का दाखवत नाहीत? आणि एवढा अहंकार, मस्ती येते कुठून?
आणखी वाचा : “कपडे काढून…”, विवेक अग्निहोत्रींवर झाले होते #MeToo चे आरोप; आता ठरतोय चर्चेचा विषय
सिने समीक्षक गणेश मतकरींनी या सिनेमाचं समीक्षण करताना लिहिलेल्या ब्लॉगमध्ये थिएटरमधल्या काही त्रासांचा उल्लेख केलाय. मतकरी सांगतात, कश्मीर फाईल्स सारख्या दुःखद तणावपूर्ण सिनेमाला फुकट पॅापकॅार्न देणं आणि आधी देशभक्तीच्या घोषणा देणाऱ्यांनीही आत शिरताना झेंडे वगैरे बाजूला ठेवून कोक पॅापकॅार्नचे ट्रे उचलणं हे काहीतरीच वाटलं. नशिबानं मी ज्या थिएटरला होतो तिथे निदान माझ्या नजरेच्या टप्प्यात असं काही नव्हतं. तर, स्वस्थ,शांत बसून,चित्रपट नीट बघणे हे दुर्मिळ होत चालले आहे. त्यामानाने नाटक बघायला येणारा प्रेक्षक समंजस असतो असं मत शुभा प्रभू साटम यांनी व्यक्त केलं आहे.