‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रकारातली गोष्ट मराठी प्रेक्षकांनी याआधी पुरेपूर अनुभवली आहे. ‘मेरे हजबंड की बीवी’ हा मुदस्सर अजीज दिग्दर्शित चित्रपट पाहिल्यानंतर ती मालिका कितीतरी पटीने चांगली होती, या विचाराने मन सुखावतं. दोन बायकांमध्ये अडकलेला गरीब बिचारा नवरा… असं या चित्रपटाचं स्वरूप आहे. त्यासाठी चित्रपटात वापरण्यात आलेली कथाकल्पनाही खरोखरच मजेशीर पद्धतीची असली तरी ती फुलवताना नेमकं काय करायचं? हे लक्षात न आल्याने मग तीच सरधोपट मांडणी करत मनोरंजनाचा फुका प्रयत्न करण्यात आला आहे.
‘मेरे हजबंड की बीवी’ या चित्रपटात अंकुर चढ्ढा या तरुणाची कथा पाहायला मिळते. खरं तर माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे गोष्ट दोघींपैकी एकीच्या मनातली असायला हवी. इथे आपल्याला अंकुर नामक नवऱ्याच्याच दृष्टिकोनातून गोष्ट पाहायला मिळते. अंकुरचा घटस्फोट झाला आहे, मात्र त्याच्या मनात पहिली पत्नी प्रबलीनची इतकी घट्ट भीती बसली आहे की काही केल्या भूतकाळ विसरून पुढे सरकणं त्याला जमत नाही आहे. त्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्याचा एकुलता एक मित्र कुरेशीची धडपड सुरू आहे. प्रबलीनचं भूत मानेवरून उतरावं यासाठी अंकुर दिल्ली सोडून हृषिकेशला येतो आणि त्याची भेट कधीकाळी त्याच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतरा खन्नाशी होते. अंतराबरोबर लग्न करून संसार थाटायची स्वप्नं पाहणारा अंकुर तिचं मन जिंकतो, तिला लग्नासाठी राजीही करतो आणि तेवढ्यात पुन्हा भूतकाळाची माशी शिंकते. अपघातामुळे काही वर्षं स्मृतीतून गेलेली प्रबलीन पुन्हा अंकुरला प्रियकराच्या भूमिकेत पाहू लागते आणि इथून खरा गोंधळ सुरू होतो. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी अवस्था असलेला अंकुर यातून मार्ग काढण्यात यशस्वी होतो का? आणि या दोन बायकांमध्ये त्याची काय गोची होते हे प्रत्यक्ष चित्रपटातच पाहायला हवं.
या चित्रपटाची कथाकल्पना पुरेशी रंजक आहे. नेहमीच्या पद्धतीची दोन बायका, फजिती ऐका अशा पद्धतीची ही कथा नाही. मुळात इथे अंकुर पहिल्या लग्नातून बाहेर पडला आहे. घटस्फोटित आहे आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आसुसलेला आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं त्याच्या आयुष्यात पुन्हा येणं हेसुद्धा प्रासंगिक आहे, ते मुद्दाम ओढूनताणून आणलेलं नाही. त्यामुळे खरोखरच अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली तर या नको त्या प्रेमत्रिकोणात अडकलेल्या तीन व्यक्ती नेमकं काय करतील? अशा रंजक पद्धतीने ही कथा फुलवता आली असती. पण वर म्हटलं तसं मुळात कथा लिहितानाच लेखक – दिग्दर्शक मुदस्सर अजीजचा गोंधळ उडाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे गोष्ट प्रबलीनची असायला हवी आणि ते सूत्र अगदी चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांत दिग्दर्शकाला पकडता आलं आहे. पण तोवर ही गोष्ट अंकुशचीच असल्याने एकांगी पद्धतीने ती लिहिली गेली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध हा जवळपास अंतराला पटवण्यात खर्ची पडला आहे. पूर्वार्ध संपता संपता अंकुश आणि प्रबलीनचा भूतकाळ आपल्यासमोर येतो आणि मध्यांतरानंतर खऱ्या अर्थाने प्रबलीन पडद्यावर येते. मग कुठे दोन बायकांची रस्सीखेच सुरू होते. अंकुश आणि प्रबलीनचं भांडण रंगवताना नाही म्हटलं तरी अंकुशच्या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकाने झुकतं माप दिलं आहे. प्रबलीनची वर्चस्ववादी वृत्ती, तिचा आक्रस्ताळा स्वभाव लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं चित्रपटभर सांगितलं जातं. प्रत्यक्षात घाईघाईत येणारे ते प्रसंग पाहताना अंकुशचीही त्यात तितकीच चूक आहे हे लक्षात येतं. मात्र केवळ विनोदासाठी केलेल्या सरधोपट मांडणीमुळे चित्रपट पूर्णत: फसला आहे.
भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत अशा दोन उत्तम अभिनेत्री असतानाही केवळ वरवरच्या भांडणातच त्यांचा अभिनय वाया घालवला आहे. तीच गत अर्जुन कपूरची. दीर्घ काळानंतर नायकाच्या भूमिकेत असलेल्या अर्जुन कपूरने अंकुरच्या भूमिकेत सुखद धक्का दिला आहे. अर्जुनपेक्षा जास्त भाव खाऊन गेला आहे तो त्याच्या मित्राच्या भूमिकेत असलेला विनोदी कलाकार हर्ष गुजराल. बाकी शक्ती कपूर आणि दिनो मोरियासारखे कलाकारही चित्रपटात चमकून गेले आहेत, पण त्यांना फारसं काही करण्यासाठी वावच मिळालेला नाही. निव्वळ मसाला मनोरंजन देण्याच्या हट्टापायी एका चांगल्या कथाकल्पनेवर दिग्दर्शकाने पाणी सोडलं आहे.
मेरे हजबंड की बीवी
दिग्दर्शक – मुदस्सर अजीज
कलाकार – अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत, हर्ष गुजराल, शक्ती कपूर, दिनो मोरिया, कंवलजीत, अनिता राज.