#MeToo या मोहिमेमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तणुकीचा आरोप करण्यात आले आहेत. यात नाना पाटेकर, विकास बहल, चेतन भगत, आलोक नाथ यासारख्या कलाकारांवर काही महिलांनी आरोप केले आहेत. त्यानंतर आता अभिनेता विकी कौशलच्या वडीलांवरदेखील दोन महिलांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
विकी कौशलचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असून चित्रपटाच्या सेटवर असताना त्यांनी अश्लील चित्रफीत दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. नमिता प्रकाश या महिलेने ट्विटरच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडली आहे. नमिताने ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’, ‘अब तक ५६’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिडेट’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
This is my story and i stand by it, Thank You @AGirlOfHerWords #metoo #timesup https://t.co/ZuadGiXFyr
— Nameeta Prakash (@namabird7) October 14, 2018
‘२००६ साली एका चित्रीकरणासाठी आमच्या चित्रपटाची संपूर्ण टीम बाहेरगावी गेली होती. यावेळी दिग्दर्शक श्याम कौशल यांनी मला व्होडका पिण्यासाठी त्यांच्या खोलीत बोलावलं. त्यानंतर मी नकार देत असतानाही त्यांनी अनेक वेळा मला ड्रिंग्स करण्याची बळजबरी केली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी अचानकपणे माझ्यासमोर मोबाईल फोन धरला आणि त्यात अश्लील चित्रफीत दाखविण्यास सुरुवात केली. या प्रकाराला घाबरुन मी तेथून कसाबसा पळ काढला’, असं नमिताने सांगितलं.
He really thought he could getaway with murder. https://t.co/d62CtRoTgO
— Nameeta Prakash (@namabird7) October 14, 2018
दरम्यान, नमितानंतर अन्य एका महिलेनेही श्याम कौशल यांच्यावर आरोप केले असून ते फोन करुन त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. ‘श्याम कौशल यांनी अनेक वेळा मला फोन करुन त्यांच्या खोलीत बोलावलं होतं. मात्र मी सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिले. मी त्यांना प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांनी सेटवर माझी खिल्ली उडविण्यास सुरुवात केली’, असा आरोप या महिलेने केला आहे.
नमिता आणि या महिलेने केलेल्या आरोपांवर अद्यापतरी श्याम कौशल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र #MeToo मध्ये श्याम यांचं नाव समोर आल्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये #MeToo ची चर्चा रंगली आहे.