बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या #MeToo मोहिमुळे अनेक बड्या व्यक्तींची नावं समोर आली होती. या मोहिमेमुळे अनेक महिलांनी मनोरंजन विश्वात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. या आरोप प्रत्यारोपात अभिनेता सुशांत सिंह राजपुतचं नावही समोर आलं होतं. सुशांतनं त्याची सहकलाकार संजना संघी हिच्याशी असभ्य वर्तन केल्याच्या चर्चा होत्या.
या बातमीनंतर सुशांतनं स्वत: संजना आणि त्याच्यामध्ये झालेल्या संवादाचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर अपलोड करून या बातमीचं खंडन केलं. तर सुशांतनं आपल्याशी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तनं केलं नसल्याचं संजनानंही स्पष्ट केलं होतं. मात्र या सगळया खोट्या चर्चांमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेला अशी खंत सुशांतनं एका मुलाखतीत व्यक्त केली.
काही पेड कँम्पेनर्समुळे माझं नाव यात गोवलं गेलं. मी पूर्णपणे निर्दोष होतो. मी टु ही खूप चांगली मोहीम आहे. या मोहीमेला पहिल्यापासून माझा पाठिंबा आहे, मात्र काहींनी या मोहिमेचा चुकीच्या पद्धतीनं वापर करत माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. मी मेहनत करून माझं नाव कमावलं होतं मात्र चुकीच्या गोष्टीमुळे ते मातीमोल झालं असं म्हणत सुशांतनं आपली खंत व्यक्त केली.