#MeToo या मोहिमे अंतर्गत विनता नंदा यांनी संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर संध्या मृदूल, रेणुका शहाणे यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी आलोक नाथ यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे आणखी एक चेहरा लपला आहे अशा प्रतिक्रिया नोंदवल्या. त्याचप्रमाणे आता अभिनेत्री हिमानी शिवपुरीनेही आलोक नाथ यांच्यावर आरोप केला आहे. आलोक नाथ यांच्यासोबत हिमानी शिवपुरीने ‘हम साथ साथ है’ आणि ‘परदेस’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. या सिनेमांच्या दरम्यान आलोक नाथ यांचा वाईट अनुभव आल्याचे हिमानी शिवपुरीने सांगतिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिमानी शिवपुरी यांनी हा खुलासा केला आहे.

एकदा चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आलोक नाथ माझ्या खोलीत आले. त्यांनी भरपूर दारु प्यायली होती. मी खूप घाबरुन गेले, मी छोट्या शहरातून आलेली अभिनेत्री होते. ते माझ्याशी गप्पा मारताना काहीही बरळत होते आणि आपण दारु प्यायलोच नाही अशा अविर्भावात वावरण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना माझ्या खोलीतून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी जाण्यास नकार दिला. मग रडू लागले आणि जोरजोरात आरडाओरडा केला. मग इतर लोक आले आणि त्यांना तिथून घेऊन गेले. माझ्यासाठी हा अनुभव भयंकर होता.

मला आलेला तो अनुभव मी विसरले होते. मात्र सध्या ही MeToo ची चळवळ सुरु झाली आहे. त्यावेळी मी आलोक नाथ यांच्यावर झालेले आरोप वाचले. त्यानंतर मला आठवले की काही वर्षांपूर्वी आलोक नाथ यांनी माझाही छळ केला आहे. संस्कारी बाबूजी ही त्यांची इमेज आहे. मात्र संध्याकाळी ६ नंतर ते दारू पिण्यास सुरुवात करतात. ज्यानंतर त्यांचा वेगळाच चेहरा समोर आला आहे, दारु प्यायल्यावर त्यांची प्रतिमाच बदलून जाते.

‘हम आपके है कौन?’ या सिनेमातही हिमानी शिवपुरी यांनी काम केले आहे. दारु प्यायली आलोक नाथ यांचे रुप पलटायचे. संस्कारी बाबूजींचा स्वतःवरचा संयम सुटत असे. पुरुष सहकाऱ्यांसोबत ते चांगलं वागत मात्र महिला कलाकरांसोबत असभ्य वर्तन करत. अनेक अभिनेत्री त्यांच्यापासून लांब राहणेच पसंत करत. दुबईमध्ये असताना एका पुरस्कार सोहळ्यात ते दारू पिऊन आले. त्यांची पत्नी त्यांच्या या गोष्टीमुळे खूप तणावाखाली आली होती. एकदा त्यांना उघड्यावर लघुशंका करतानाही पकडले गेले होते. तर उद्धटपणा केल्याने विमानातून उतरवण्यात आले होते असेही हिमानी शिवपुरी यांनी सांगितले.