तनुश्री दत्ताला नाना पाटेकर, राज ठाकरे यांनी भाव दिला नाही. यामुळे बेछूट आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा तिचा प्रयत्न फसला. आता प्रसिद्धी मिळवण्यासाठीच तिने माझ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. आता मी देखील न्यायालयातच तिला सडेतोड प्रत्युत्तर देणार, असे अभिनेत्री राखी सावंतने म्हटले आहे. मी देखील तनुश्रीविरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे तिने म्हटले आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर राखी सावंत नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली होती. राखीने तनुश्री व्यसनाधीन होती, असा दावा केला होता. सोमवारी तनुश्रीने राखीविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. तनुश्रीच्या वतीने राखीवर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राखी सावंतने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे.

राखी सावंत म्हणाली, तनुश्री दत्ताला नाना पाटेकर, राज ठाकरे यांनी भाव दिला नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठीच तिने हा खटाटोप केला होता. आता राखी सावंतला लक्ष्य करुन प्रसिद्धी मिळवण्याचा तिचा प्रयत्न आहे. मी देखील तनुश्रीला न्यायालयात सडेतोड उत्तर देणार आहे. तनुश्रीने माझा उल्लेख ‘लोअर क्लास’ असा केला होता. त्यामुळे मी तिच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे राखीने सांगितले.

‘मी टू’ मोहिमेचा मार्ग भरकटत असून ज्यांच्यासोबत काही झालंच नाही ती लोकंही आरोप करत आहेत. आपण एकतर्फी विचार करतोय. शेखर सुमन यांच्या मुलानेही शोषणाचे आरोप केले होते. ह्रतिक रोशननेही असाच दावा केला होता. आपण ‘मी टू’ मोहिमेमध्ये फक्त महिलांची बाजू का ऐकून घेतोय. पुरुषांचे म्हणणेही ऐकून घेतले पाहिजे, असे राखीने सांगितले.

तनुश्री दत्ताला अमलीपदार्थांचे व्यसन होते. ती स्वत:च मला दोन ते तीन वेळा रेव्ह पार्टीत घेऊन गेली होती. सुदैवाने मी तिच्याशी मैत्री तोडली नाही तर मलाही व्यसनमुक्ती केंद्रात जावे लागले असते, असे राखीने म्हटले आहे.

Story img Loader