‘मी टु’ सारख्या मोहिमेनं बॉलिवूडमधल्या अनेक दिग्दर्शकांचे खरे चेहरे उघड केले. या मोहिमेमुळे मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं बळ मिळालं. या मोहिमेअंतर्गत आलिया भट्टची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. एका चित्रीकरणादरम्यान माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. पण मी गप्प बसले. त्याच्या चुकीची शिक्षा मला त्याच्या कुटुंबियांना द्यायची नव्हती असं म्हणत सोनी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझ्यावरही चित्रीकरणादरम्यान बलात्काराचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला. पण सुदैवानं मी वाचले. त्यानंतर या प्रकरणाची वाच्यता मी कुठेही केली नाही. मी केवळ शांत बसले. त्या व्यक्तीला लहान मुलं होती. त्याचंही कुटुंब होतं जर मी आवाज उठवला असता तर नक्कीच त्याच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असता. त्यालाही मोठ्या अडचणींना समोरं जावं लागलं असतं. तो काळ खूपच वेगळा होता. त्याच्या चुकीची शिक्षा मला त्याच्या कुटुंबियांना द्यायची नव्हती म्हणूनच मी गप्प बसले’ असं सोनी ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

पण असाच प्रसंग आजाच्या काळात उद्भवला असता तर मी नक्कीच आवाज उठवला असता असंही सोनी म्हणाल्या. तर दुसरीकडे बलात्कार आणि लैंगिंक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या आलोक नाथ यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. आलोक नाथ यांना मी चांगलीच ओळखून आहे. मद्यपान केल्यानंतर त्यांचा खरा चेहरा समोर येतो. त्याची वाईट नजर माझ्यावरही होती पण त्यांना जे हवं होतं ते कधीच घडलं नाही असंही सोनी म्हणाल्या. नुकतंच सोनी ‘राझी’ चित्रपटात मुलगी आलिया भट्ट सोबत झळकल्या होत्या.

बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्तानं एका अर्थानं या मोहिमेला सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दिग्दर्शक साजिद खान, आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, कैलास खेर, रजत कपूर यांसारख्या अनेकांवर गैरवर्तणुकीचे आरोप आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metoo somebody tried to rape me soni razdan alia bhatt mother