मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात काम करताना दिसत आहेत. शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं. सहा वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले. त्यानतंर आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शरद पोंक्षेंनी याबद्दल व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शरद पोंक्षेंनी याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ त्यांनी या नाटकाबद्दलची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “पोलिओ, टायफॉइड, कॅन्सर अन् हाडांची मोडतोड”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झालीय ‘अशी’ अवस्था, म्हणाला “औषधांचा प्रभाव ओसरल्यानंतर…”
“नमस्कार आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला आज एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे. मी ११ मार्च २०१८ ला मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. त्यानंतर जाहीर केलं की मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केलं नाही.
पण गेली पाच वर्ष महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांनी मला या नाटकाचे प्रयोग करा, असे सांगितले. आमच्या पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचं आहे, थोडे तरी प्रयोग करा, असे वारंवार लोक मला सांगत होते.
त्यानंतर मग मी विचार केला की, एकंदरीत माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता आता जर मी हे नाटक केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही.त्यामुळेच मग मी फक्त ५० प्रयोगांसाठी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर २०२३ संपूर्ण महाराष्ट्रात मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे प्रयोग करणार आहे”, असे शरद पोंक्षेंनी सांगितले.
दरम्यान शरद पोंक्षे यांनी हे नाटक अनेक वर्ष केले. या नाटकादरम्यान त्यांना धमकीचे फोनदेखील आले होते. मात्र त्यांनी आणि नाटकाच्या पूर्ण टीमने न घाबरता या नाटकाचे प्रयोग सुरु ठेवले. या नाटकाने १००० प्रयोग केले. महाराष्ट्राचं नव्हे तर गोव्यातदेखील या नाटकाने हाऊसफुल्लचे बोर्ड बघितले. या नाटकाचे लेखन प्रदीप दळवी यांनी केले होते. तर विनय आपटे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते.