|| पंकज भोसले
दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंग्रहालय जोपासणारा केव्हिन रिचर्डसन गेल्या दीड-दोन दशकांपासून लोकप्रिय आहे, तो त्याच्या सिंहांसोबत अशक्य वाटू शकणाऱ्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे. सिंहांशी खेळताना, त्यांना दमदाटी करताना आणि त्यांना गोंजारतानाच्या यू-टय़ूबवरील शेकडो व्हिडीओ क्लिप्स तसेच डझनांवरी माहितीपटांमुळे तो सिंहाळलेला मानव म्हणून आफाट लोकप्रिय आहे. त्याच्या या सिंहसान्निध्याचा वापर उत्तम कथानिर्मिती असलेल्या ‘मिआ अॅण्ड व्हाइट लायन’मध्ये पुरेपूर करण्यात आला आहे.
‘मिआ अॅण्ड व्हाइट लायन’ प्रेक्षकांना खूप जवळून सिंह दर्शन करू देणारा माहितीपट नाही. फ्रेंच दिग्दर्शक गिल्स द मायेस्ट्री याने तीन वर्षांचा प्रदीर्घ काळ दक्षिण आफ्रिकेतील प्राणिसंग्रहालयातील सिंह आणि प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या लहान मुलीमध्ये मैत्री घडवून आपल्या कथेला पोषक वातावरण निर्मिती करण्याचा केलेला प्रयत्न आहे. येथील प्राणीजीवन जसेच्या तसे चितारित झाले आहे. कोणत्याही ‘सीजीआय’ इफेक्टशिवाय ते असल्याने माणूसजीवनाची नेहमीची गोष्ट फार देखण्या रूपात घडविण्यात आली आहे.
कुत्र्या-मांजरांच्या माणूसप्रेमाच्या गोष्टी अमेरिकी सिनेमाने गेल्या पंधरा-वीस वर्षांत खूप लोकप्रिय केल्या. पण जंगली प्राण्यांवरील कथानक आले की त्यांना ‘कम्प्युटर ग्राफिक इमेजरी’ला पर्याय नसतो. कारण जंगली जनावरांकडून कथेबरहुकूम काम करणे अशक्य असते आणि त्यांच्यासोबत काम करताना माणसांचे जीव धोक्यात ठेवणे परवडणारे नसते. जंगलातील प्राण्यांवर छुप्या कॅमेऱ्याद्वारे माहितीपट करावा लागतो, पण दीर्घ लांबीचा कथानकप्रधान चित्रपट करायचा झाला, तर सीजीआय इफेक्ट्सद्वारे खोटा प्राणी खरा भासवावा लागतो. भालू , पेंग्विन, हत्ती आणि खुद्द सिंहावरही संगणकाधारे चित्रपट तयार झाले आहेत.
‘मिआ अॅण्ड व्हाइट लायन’ या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, तो त्यात संगणकीय तंत्राचा वापर न करता खऱ्याखुऱ्या सिंहाचा जीवनव्यवहार चित्रित करण्यात आल्यामुळे. चित्रपटाची गोष्ट सुरू होते लंडन सोडून दक्षिण आफ्रिकेतील वडिलोपार्जित प्राणिसंग्रहाची देखभाल करण्यासाठी आलेल्या कुटुंबापासून. या कुटुंबात ११ वर्षांच्या मिआला (डानिया डी विलर्स) आफ्रिकी वातावरण आणि निसर्ग सान्निध्य यांच्यात काडीचाही रस नसतो. कुटुंबासोबत ओढले गेल्याची जाणीव कायम आपल्यासोबत वागवत ती आपली नाराजी वेळोवेळी प्रगट करीत असते. लंडनमधील आपल्या मित्रासोबत व्हिडीओ चॅटिंग आणि उरलेल्या वेळात आफ्रिकेविषयीची घृणा प्रगट करण्यात तिचे किरकिरे आयुष्य सुरू असते.
एक दिवस वडील सहसा न आढळणारा सिंहाचा पांढरा बछडा घरी घेऊन येतात. कुत्र्यासारखे वावरणाऱ्या या बछडय़ाबाबत मिआला सुरुवातीला राग असतो. मात्र अल्पावधीतच तिला त्याचा लळा लागतो. चार्ली नामकरण झालेल्या या सिंहाची वाढ वेगात व्हायला लागते, तसे त्याला कुटुंबाऐवजी पिंजऱ्यात ठेवण्याची गरज निर्माण व्हायला लागते. मिआव्यतिरिक्त कुणालाही न जुमानणाऱ्या या सिंहाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मिआचा त्याच्यासोबतचा वावर कुटुंबातील आई-वडिलांच्या चिंतेचा विषय बनतो. त्यातच सिंहाला विकण्याचा घाट वडिलांकडून घातला जातो. वडिलांच्या जंगली श्वापद विक्रीमागचे एक रहस्य जाणल्यानंतर मिआ आपल्या पांढऱ्या सिंहाला घेऊन प्राणिसंग्रहालयातून पळ काढते. त्याला संरक्षित वनात नेऊन सोडण्याची तिची योजना मात्र सोपी नसते.
‘मिआ अॅण्ड व्हाइट लायन’ संपूर्णपणे कुटुंबाने पाहण्याचा साहस-मनोरंजनयुक्त सिनेमा आहे. आकाशकोनांमधून टिपलेले आफ्रिकी निसर्गदृश्य येथे अनेकदा येतात. वाघ-सिंहांसह कित्येक प्राणी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात सहज पाहायला मिळतात. पण इथले सर्वात महत्त्वाचे आहे, ते प्रमुख व्यक्तिरेखेसोबत सिंहाशी दाखविण्यात आलेली मैत्री. यात बछडय़ा अवस्थेतील सिंहासोबत या अभिनेत्रीला वास्तव्य करावे लागले. तिच्या वाढीसोबत सिंहाची शरीर आणि मनाची जडणघडण झाली. तीन वर्षांहून अधिक काळ घरात आणि बाहेर तिच्यासोबत राहून पूर्णपणे तिच्याशी घनिष्ट बनल्याने चित्रीकरणादरम्यान अडचणीविना ही कथा फुलविण्यात आली आहे. या चित्रपटातील सिंहाला चितारित करणारा प्रत्येक प्रसंग केव्हिन रिचर्डसन या सिंहमित्राच्या देखरेखीखाली झाला आहे.
मानव विरुद्ध प्राणी किंवा मानव विरुद्ध निसर्ग अशा प्रकारच्या चित्रपटांत ‘मानवच किती क्रूर असतो’ हा संदेश निपजणारी एकसुरी धाटणी अमेरिकी सिनेमांनी लोकप्रिय केली आहे. त्याबरहुकूम हा इंग्रजी भाषेत असलेला फ्रेंच चित्रपट सर्वार्थाने जात नाही. अति साहसाच्या आणि अवघड प्रसंगांच्या अनावश्यक मालिका न राबविताही हा चित्रपट पांढऱ्या सिंहाचे अवलोकन करण्यात प्रेक्षकाला गुंतवू शकतो