‘हॅरी पॉटर’ हे नाव माहित नसलेली व्यक्ती शोधून सापडणंही अवघड आहे. केवळ भारत अमेरिकेतच नाही तर जगातील कित्येक मुलांचं बालपण अधिक अविस्मरणीय करण्यात याच ‘हॅरी पॉटर’चा खूप मोठा सहभाग आहे. आज अशाच असंख्य ‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे. आता या चित्रपटातील एका मोठ्या कलाकाराचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
‘हॅरी पॉटर’ चित्रपटामध्ये ‘डंबलडोअरची’ हे पात्र साकारणारे अभिनेते मायकेल गॅम्बॉन यांचे निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एका गंभीर आजाराचा सामना करत होते. त्यांच्या निधनाने सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : हॅरी पॉटरचा ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड; रॉबी कॉलट्रेन यांचे ७२ व्या वर्षी निधन
मायकेल गॅम्बॉन यांच्या पत्नी पब्लिसिट क्लेयर डॉब्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सर मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त जाहीर करताना अत्यंत दु:ख होत आहे. ते एक प्रेमळ वडील आणि पती होते. त्यांचा मृत्यू न्युमोनिया या आजारामुळे झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी वाचा : CID मालिकेतील एसीपी प्रद्युमन आणि इन्स्पेक्टर अभिजीत यांच्या लूकमध्ये झाला मोठा बदल, फोटो आला समोर
मायकल यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांची ‘हॅरी पॉटर’मधील ‘हेडमास्टर डंबलडोअर’ ही भूमिका प्रचंड गाजली. या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले. मायकल यांनी हॅरी पॉटरच्या आठ चित्रपटांपैकी सहा चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रेटी, कलाकार पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.