Tito Jackson Passed Away: मायकल जॅक्सनचे भाऊ आणि प्रसिद्ध पॉप ग्रुप जॅक्सन 5 चे सदस्य टिटो जॅक्सन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टिटो जॅक्सनची मुलं टीजे, ताज आणि टेरिल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ही बातमी कळल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. टिटो जॅक्सन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असं म्हटलं जात आहे.
टिटो जॅक्सन यांच्या मुलांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लहानपणापासून ते आतापर्यंतचे वडिलांबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांनी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. “आमचे वडील, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमर टिटो जॅक्सन यांचे निधन झाले आहे, त्यांच्या निधनाची बातमी देताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. आम्हाला धक्का बसला आहे,” असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर चाहते कमेंट्स करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
टिटो जॅक्सन यांच्या निधनाचे कारण
टिटो जॅक्सन यांच्या निधनाचे कारण अद्याप कुटुंबियांनी सांगितले नाही. पण जॅक्सन कुटुंबाचे जुने मित्र आणि टिटो यांचे सहकारी स्टीव्ह मॅनिंग यांनी व्हेरायटीला सांगितलं की टिटो जॅक्सन यांना रोड ट्रिप दरम्यान हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले.
टिटो जॅक्सन यांची लोकप्रिय गाणी
टिटो जॅक्सन यांचे पूर्ण नाव टोरियानो एडरिल आहे. ते उत्तम गायक, डान्सर असण्यासोबतच गिटारही वाजवायचे. त्यांनी भावंडांप्रमाणेच गायनात यश मिळवलं आणि नाव कमावलं. ६०-७० च्या दशकात त्यांना जगभरात ओळख मिळवली. आय वॉन्ट यू बॅक, आय विल बी देअर, द लव्ह यू सेव्ह आणि एबीसी ही त्यांची सर्वात लोकप्रिय गाणी आहेत.
२०१६ मध्ये आला होता त्यांचा पहिला सिंगल अल्बम
२०१६ मध्ये, त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘टिटो टाइम’ रिलीज केला होता. यानंतर त्यांचे इतर अनेक अल्बम आले आणि त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. टिटो जॅकी जॅक्सन आणि मार्लन जॅक्सन या भावंडांबरोबर इंग्लंड, स्कॉटलंड आणि कॅलिफोर्नियामध्ये परफॉर्म करत होते. त्यांनी ८ सप्टेंबर रोजी इंग्लंडमध्ये शेवटचा परफॉर्मन्स केला होता.