कोरिओग्राफर वाड रॉबसनने मायकल जॅक्सनवर मुलांचे लैंगिक शाषण करताना पकडले जाऊ नये, म्हणून कोणत्याही पातळीपर्यंत घसरण्याचा आरोप केला आहे. मायकल जॅक्सनने यासाठी आपल्या बेडरूमच्या बाहेर अलार्मदेखील बसवला होता, असे त्याने म्हटले आहे.
२००५ मध्ये दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीवेळी रॉबसनने मायकल जॅक्सनकडून होणा-या बाल लैंगिक शोषणाच्या आरोपांचे खंडण केले होते. परंतु, आपल्या या भूमिकेत अचानक बदल करून रॉबसनने जॅक्सन इस्टेटच्या विरोधात न्यायालयीन खटला दाखल केला. यात जॅक्सनने १९९० पासून सतत ७ वर्षे आपले लैंगिक शोषण केल्याचे म्हटले आहे. ३० वर्षीय रॉबसनने दाखल केलेल्या तक्रार दुरूस्तीत जॅक्सनच्या खोली पासून ३० फुटाच्या अंतरावर कोणी आल्यास अलार्म वाजत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मायकल आपल्या खोलीच्या बाहेर ‘डू नॉट डिस्टर्ब’ची पाटी देखील लटकवत असल्याचा दावा रॉबसन करत असल्याचे टीएमसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
मायकल आणि मी अनेकवेळा शरीरसंबंध ठेवल्याचे, मायकलने आपल्याला अश्लील चित्रपट दाखवल्याचे आणि आपण एकमेकांवर प्रेम करत असून, ही बाब लोकांच्या आकलनशक्तीच्यापलीकडची असून, याबाबत कोणाशीही वाच्यता न करण्याचे मायकलने आपल्याला सांगितल्याचे रॉबसनने दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे.
मायकलने आपला ब्रेनवॉश केल्यामुळे २००५ मध्ये आपण मायकलच्या बाजूने बोलल्याचा दावा रॉबसनने केला. रॉबसनचे सर्व आरोप अपमानकारक असून, मायकल जॅक्सनच्या मालमत्तेतून पैसे उकळण्याचा हा एक डाव असल्याचे म्हणत जॅक्सन इस्टेटने रॉबसनचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.