रिअलिटी शोच्या माध्यमातून आपला पार्टनर शोधणं खरं तर आता नवा ट्रेन्ड राहिलेला नाही. आता पर्यंत रतन राजपूत, राखी सावंत, मल्लिका शेरावत आणि राहुल महाजन यांसारख्या कलाकारांनी नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर केलं आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक मीका सिंह देखील रिअलिटी शोच्या माध्यमातून आपली लाइफ पार्टनर शोधणार असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मीका सिंहचा हा रिअलिटी शो आगामी काळात म्हणजेच काही महिन्यांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मीका सिंह या शोमध्ये लग्न करणार नाही तर केवळ साखरपुडा करणार आहे. त्यानंतर तो हे नातं पुढे नेणार आहे. मीका सिंह त्याच्या या शोसाठी खूपच उत्सुक आहे. देशभरातून वेगवेगळ्या कटेस्टंट या शोमध्ये सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा- “मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”; अदित्य ठाकरेंना टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप
या शोबाबतचं सर्वात मजेदार अपडेट म्हणजे राखी सावंत देखील या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. राखी आणि मीका एकेकाळी त्यांचा वादग्रस्त किस प्रकरणामुळे बरेच चर्चेत आले होते. स्वतःच्याच बर्थडे पार्टीमध्ये मीकानं राखीला जबरदस्ती किस केलं होतं. ज्यानंतर राखीन त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आता या दोघांमधील सर्व वाद मिटले आहेत. अलिकडेच मीकानं बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला पाहून राखी सावंत आश्चर्यचकीत झालेली दिसली.
दरम्यान अशा शोवर प्रेक्षक फारसे विश्वास ठेवत नाहीत कारण रतन राजपूत, राखी सावंत आणि मल्लिका शेरावत यांनीही अशा प्रकारच्या शोमधून आपला पार्टनर निवडला होता मात्र त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं नाही. मात्र राहुल महाजननं मात्र ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या शोमध्ये बंगाली मॉडेल डिंपी गांगुलीशी लग्न केलं होतं. २०१० साली या दोघांचं लग्न झालं होतं मात्र २०१५ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला.