बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटक झाली. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुलाला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आर्यनला पाठिंबा दिला आहे. आता गायक मिका सिंगने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेता हृतिक रोशन पाठोपाठ आता मिका सिंगने आर्यन आणि शाहरुखला पाठिंबा देत ट्वीट केले आहे. मिकाने संजय गुप्ता यांचे ट्वीट रिट्वीट केले आहे. ‘तुमचे अगदी बरोबर आहे. सर्वजण काय सुरु आहे हे फक्त पाहात आहेत, पण एकही शब्द बोलत नाहीत. माझा शाहरुख खानला पाठिंबा आहे. आर्यन खानला जामीन मिळायला हवा. मला असे वाटते इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील, तेव्हाच सर्वजण एकत्र येतील’ या आशयाचे ट्वीट मिका सिंगने केले आहे.
आणखी वाचा : ‘कशा असतात ह्या बायका’, तेजश्री प्रधान एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला
काय होते संजय गुप्ताचे ट्वीट?
शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कार्यासाठी तो नेहमीच मदत करत असतो. आणि आज त्याच इंडस्ट्रीमधील लोक त्याच्या कठीण काळात मौन बाळगून आहेत. हे किती लज्जास्पद आहे या आशयाचे ट्वीट संजय गुप्ता यांनी केले आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये गजाआड आहे. आर्यन केसवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळत त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शाहरुख खान आणि आर्यन खानचे वकील आर्यनला लवकरात लवकर जामीन मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पुढील तीन दिवसात म्हणजेच २९ ऑक्टोबर पर्यंत जर न्यायालयाने जामीन अर्जावर कोणताही निर्णय दिला नाही तर आर्यनला १५ नोव्हेंबर पर्यंत जेलमध्येच राहवं लागू शकतं.