‘मितवा’ या मराठी चित्रपटाद्वारे रामानंद सागर यांचा वारसा लाभलेले मिनाक्षी सागर प्रॉडक्शन पहिल्यांदाच मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. रामानंद सागर यांची नात असणा-या मिनाक्षी सागर यांनी याआधी अनेक हिंदी मालिकांसाठी लेखन केले आहे. मिनाक्षी सागर प्रॉडक्शनच्या ‘मितवा’ या चित्रपटात मराठीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसेच स्वप्ना वाघमारे-जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘मितवा’ ही म्युझिकल लव्हस्टोरी असून या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय यांचे संगीत लाभले आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदीतील दिग्गजांचा सहभाग असलेली ‘मितवा’ ही कलाकृती नक्कीच वेगळी ठरणार आहे. मुंबईत नुकताच शानदार समारंभात ‘मितवा’ चित्रपटाचा कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मुहूर्त करण्यात आला. तसेच या चित्रपटात सोनाली कुलकर्णीच्या साथीला काम करण्यासाठी आणखी एका नायिकेचा शोध सुरू आहे. यासाठी 9 एक्स झक्कास वाहिनीवर होणा-या लक्स झक्कास हिरॉईन टॅलेंट हंटद्वारे नायिकेचा शोध घेण्यात येणार आहे. या टॅलेंट हंटमध्ये सहभाग घेण्यासाठी येत्या 26 मार्चपर्यंत प्रवेशिका पाठवायच्या असून त्यासंबंधीची अधिक माहिती 9 एक्स झक्कास वाहिनीवर देण्यात येईल. शिवाय http://www.jhakaasheroine.com  या संकेतस्थळावरही आपण याबद्दलची माहिती मिळवू शकता.

Story img Loader