‘मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ’’, अशा घोषवाक्यासह प्रदर्शित झालेल्या अभिनेता स्वप्निल जोशीच्या नव्या चित्रपटाचा टीझर सध्या लोकांचे लक्ष वेधून घेतो आहे. बदलत्या काळानुसार कलाकारांनीही आपल्या अभिनयात, विचारात बदल करायला हवा, असं स्वप्निलचं ठाम मत आहे. त्यामुळे नव्या वर्षात आपण खरोखरच वेगळे विषय आणि भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचेही त्याने विश्वासाने सांगितले आहे. त्याची प्रचीती ‘अश्वत्थ’ या त्याच्या नव्या चित्रपटाच्या टीझरने दिली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांच्या काळात मराठीतील अनेक आघाडीचे कलाकार प्रेक्षकांसमोर आलेले नाहीत. या दोन वर्षांत त्यांनी केलेले चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेले नाहीत. त्यामुळे हे रखडलेले चित्रपट आणि वेबमालिका प्रेक्षकांसमोर येतीलच, मात्र या काळात प्रेक्षकांची मनोरंजनाबद्दल असलेली अपेक्षा, निकषही बदललेले आहेत. ओटीटीमुळे जगभरातील सर्वोत्तम आशय घरच्या घरी प्रेक्षक पाहू शकतात. त्यामुळे त्यांना तितकाच दर्जेदार आशय देणे ही कलाकार म्हणून आपली जबाबदारी आहे, असं स्वप्निल म्हणतो. ‘अश्वत्थ’ या चित्रपटाबद्दल आत्ताच काही तपशील सांगता येणे शक्य नाही, मात्र अभिनेता-दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट पूर्णपणे वेगळा असेल याची खात्री तो देतो. ‘एबी आणि सीडी’, ‘एक सांगायचंय’, ‘ऋणानुबंध’, ‘मुंगळा’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी आपले वेगळे स्थान लोकेशने याआधीच चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. आता स्वप्निल जोशी आणि लोकेश गुप्ते हे नवं समीकरण, नव्या वर्षात ‘अश्वत्थ’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेते मकरंद देशपांडे यांचाही आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांचीही या चित्रपटात भूमिका आहे का, याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून या वर्षीच्या हिवाळ्यात चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा