‘सम्राट अॅण्ड कं’ चित्रपटाची प्रसिद्धी अनोख्या पद्धतीने करण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी काही अॅनिमेशनपटाची निर्मिती केली असून, चित्रपटावर आधारित कॉमिक बूक आणि व्हिडिओ गेमची निर्मितीदेखील ते करणार आहेत. चित्रपटातील वास्तविक कलाकार राजीव खंडेलवाल, मडालसा शर्मा आणि गोपाल दत्त यांच्या व्यक्तिरेखेचे अॅनिमेशन करण्यात आले असून, या कलाकारांनी आपला आवाजदेखील या अॅनिमेशनपटाला दिला आहे. हा नव्या जमान्याचा गुप्तहेर असल्याने वास्तविक चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी अशा अनेक छोट्या अॅनिमेशनपटांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक अॅनिमेशनपटात सम्राट एक नव्या गुन्ह्याचा तपास करताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक घातक म्हणाले, ‘सम्राट अॅण्ड कं’ माझ्यासाठी निव्वळ चित्रपट नसून, सम्राटचं जग हे अनेक कथांनी आणि त्याच्या साहसाने भरलेले आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कॉमिक बूक आणि व्हिडिओ गेमची निर्मिती करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या मुळ उद्देशाला समर्पक अशाच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाद्वारे चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचा निर्णय जाणिवपूर्वक घेण्यात आला आहे. चित्रपट निर्माण करणाऱ्या अनेक निर्मितीसंस्था असल्याकारणाने आम्ही वेगळा मार्ग अवलंबल्याचे निर्माता कविता बडजात्या म्हणाल्या. २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सम्राट अॅण्ड कं’ चित्रपटाची निर्मिती कविता बडजात्या यांनी आपल्या राजश्री प्रॉडक्शनद्वारे केली आहे. चित्रपटात राजीव खंडेलवाल प्रमुख भूमिका साकारत आहे.

Story img Loader