लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सध्या सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांचा मुलगा सौरभ शेट्टी यांनी प्रवीण तरडेंची खास भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रवीण तरडे यांचे चित्रपटाच्या यशाबद्दल कौतुक केले.
राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रवीण तरडेंचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे यावेळी सौरभ शेट्टी यांनी त्यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत प्रवीण तरडे, राजू शेट्टी आणि सौरभ शेट्टी पाहायला मिळत आहेत. यावेळी सौरभने मी ज्यांचा चाहता होतो ते तर माझ्या वडिलांचेच मोठे चाहते निघाले, अशा आशयाखाली एक पोस्ट शेअर केली आहे.
सौरभ शेट्टीची संपूर्ण पोस्ट
“काल कामानिमित्त साहेबांच्या सोबत पुण्याला आलो होतो, आणि गाडीमध्ये बसताना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासंदर्भात चर्चा रंगली. हंबीरराव मोहिते यांची अभिनय करणारे अभिनेते प्रवीण तरडे यांच्या अभिनयाचे मी खूप कौतुक केलं. आणि मी इच्छा व्यक्त केली की मला आज भेटायचं आहे आणि साहेबांनी प्रवीण तरडे यांना फोन केला वटवृक्ष एंटरटेनमेंटचे मालक देऊळ बंद पिक्चर निर्माते बापू वाणी यांच्या घरी भेटायचं ठरलं.
बापू वाणी यांच्या घरी पोहोचताच बापू आणि प्रवीण तरडे यांनी साहेबांचे स्वागत करून घट्ट मिठी मारली आणि तेवढ्यात साहेबांनी माझी ओळख करून दिली. तेवढ्यातच प्रवीण तरडे म्हणाले “बाळा तू माझाच आहेस पण मी तुझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता आहे. ज्या पद्धतीने शेती साहेब शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढतात त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे” असं म्हणत त्यांनी साहेबांच्या कामाचं कौतुक केलं. तब्बल दीड-दोन तास आम्ही चर्चा केली गप्पा मारल्या आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांना आणि मला प्रविणजी सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील काही क्षण टीव्हीवर दाखवले. या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल मा.राजू शेट्टी साहेबांनी प्रवीण तरडे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहेत. दरम्यान प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाने विक्रमी कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली होती. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे साकारत आहेत.