Minu Muneer : केरळ राज्य चलचित्र अकादमीचे अध्यक्ष रंजित आणि अॅक्टर्स असोसिएशनचे सरचिटणीस सिद्दिकी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. दरम्यान, आता अभिनेत्री मिनू मुनीर हिनेही सोमवारी काही अभिनेत्यांवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुनीर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अभिनेते मुकेश, जयसूर्या, मनियानपिल्ला राजू आणि मल्याळम मूव्हिज आर्टिस्टचे प्रमुख नेते एडावेल बाबू यांची नावे सांगितली. त्यापैकी मुकेश, जयसूर्या आणि बाबू यांनी मुनीरच्या दाव्यांना प्रतिसाद दिला नाही. तर, राजू यांनी चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. हेमा समितीच्या अहवालानंतर समोर आलेल्या खुलाशांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य पोलिसांच्या टीममध्ये मी तक्रार दाखल करणार आहे, असंही मुनीर यांनी माध्यमांना सांगितलं.
हेही वाचा >> Kannada Actor Darshan : अभिनेता दर्शन थूगुदीपाला तुरुंगात मिळतेय ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’? फोटो सोशल मीडियावर व्हायरल
कॅलेंडर (२००९) आणि नदाकामे उल्काम (२०११) या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान एका अभिनेत्याने तिच्यावर हॉटेलमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुनीर यांनी केला आहे. “तो खोलीत आला आणि मला बेडवर खेचून म्हणाला की चांगली संधी (कामाची) मिळाल्यास मी तुझं नाव सुचवेन.. त्यानंतर मी ते ठिकाण सोडले. त्याआधी एकदा कारने प्रवास करत असताना एका अभिनेत्याने रात्री खोलीत येणार असल्याचे सांगितले. त्या रात्री त्याने माझ्या खोलीचे दारही ठोठावले होते”, असं ती म्हणाली.
तसंच, २००८ सालीही एका अभिनेत्याने गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. मी शौचालयातून परतत असताना एका अभिनेत्याने मला मागू पकडले आणि चुंबन घेतले. मी त्याला खाली ढकलून तिथून पळ काढला. त्याने नंतर मला त्याच्या फ्लॅटवरही बोलावले होते. पण मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं नाही.
शेवटी मी मल्याळम सिनेसृष्टी सोडली
मिनूने असा दावाही केला की, तिने २०१३ मध्ये AMMA च्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. “तीन चित्रपटांमध्ये काम केलेली व्यक्ती AMMA च्या सदस्यत्वासाठी पात्र आहे. अर्ज भरण्यासंदर्भात मी त्यांना फोन केला असता त्यांनी मला त्यांच्या फ्लॅटवर बोलावले. मी त्याच्या फ्लॅटवर अर्ज भरत असताना, त्याने मागून माझ्या मानेचे चुंबन घेतले. मी फ्लॅटच्या बाहेर पळत सुटले. मलाही सदस्यत्व मिळाले नाही”, तिने दावा केला. अशा अनुभवांमुळे मी मल्याळम फिल्म इंडस्ट्री सोडली आणि चेन्नईला स्थायिक झाले, असंही ती म्हणाली.
© IE Online Media Services (P) Ltd