अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यने संपूर्ण मनोरंजन सृष्टीला धक्का बसला आहे. ही घटना घडत नाही तोवर मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे. ते ७५ वर्षांचे होते. सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्याच्या या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या निधनाने अनेक कलाकरांना धक्का बसला आहे.
मराठीच नव्हे तर हिंदी कलाकारांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मिर्झापूर’, ‘दिल्ली क्राईम’ यांसारख्या वेबसीरिजमधून लोकप्रिय ठरलेले अभिनेते राजेश तैलंग यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी असं लिहलं आहे ‘एक उत्तम अभिनेते आणि महान माणूस. श्री सुनील शेंडे आता हयात नाहीत. मला त्यांच्याबरोबर शांती मालिकेत काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या मालिकेत मी त्यांच्या मुलाचे काम केले होते. बाबूजी श्रद्धांजली.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुनील शेंडे घरातच चक्कर येऊन पडले. यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची सून जुईली शेंडे यांनी दिली.
अक्षय कुमार गुजरात दौऱ्यावर! ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट देत म्हणाला…
मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेता अशी त्यांची ओळख होती. सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले. मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मालिकांप्रमाणे ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘निवडुंग’ (१९८९), ‘मधुचंद्राची रात्र’ (१९८९), ‘जसा बाप तशी पोर’ (१९९१), ‘ईश्वर’ (१९८९), ‘नरसिम्हा’ (१९९१) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.