तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. तिच्याआधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब मिळाला. दरम्यान नुकतंच हरनाझ संधू हिने एका वेबसाईटला मुलाखत दिली. त्यावेळी तिने बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अनेक खुलासे केले.
हरनाझ संधू हिने नुकतंच ई टाईम्स या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, “मी एखाद्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन मिस युनिव्हर्स होईन असा कधीही विचार केला नव्हता. हे सर्व अचानक घडले. मला वयाच्या १७ व्या वर्षाची असताना सुष्मिता सेन, प्रियांका चोप्रा आणि लारा दत्ता यांच्याकडून प्रेरणा मिळू लागली. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच मी देखील लोकांना प्रेरित केले पाहिजे असे त्यावेळी मला वाटले.”
हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावल्यानंतर अनेक बॉलिवूडकरांनी तिचे कौतुक केले होते. अनेकांनी सोशल मीडियावर ट्वीट करत यावर भाष्य केले होते. हरनाझ ही मिस युनिव्हर्स या स्पर्धेत भाग घेण्याच्या आधीपासूनच सिनेसृष्टीत कार्यरत आहे. यावेळी हरनाझला बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
सैफमुळे तैमूर बिघडत आहे; करीनाने केला पतीवर आरोप
त्यावर ती म्हणाली, “मला माहित नाही पुढे काय होईल. कारण मी माझ्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट कधीच ठरवून करत नाही. पण जर मला संधी मिळाली तर मला बॉलिवूडचा भाग व्हायला नक्कीच आवडेल, कारण ते माझं स्वप्न आहे. अभिनय करणे हे माझे प्रोफेशन आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून रंगभूमीवर काम करत आहे. मला अशा लोकांचा भ्रम तोडायचा आहे ज्यांना वाटते की महिला काहीही करू शकत नाहीत आणि ती गोष्ट फक्त अभिनयाद्वारे सिद्ध होऊ शकते. कारण चित्रपटांद्वारे तुम्ही लोकांना प्रेरित करू शकता.”
यावेळी हरनाझला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत किंवा दिग्दर्शकासोबत काम करण्यास तुला जास्त आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “जर संधी मिळाली तर मला संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करायचे आहे. कारण मला त्यांचे चित्रपट आवडतात. त्यांची गुणवत्ता, कला आणि कथेचे स्वरुप खूप चांगले असते.”
अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खूशखबर, लवकरच बहुचर्चित ‘रावडी राठोड’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला
“त्यासोबतच मी अभिनेता शाहरुख खानचा खूप आदर करते. त्याने आतापर्यंत जेवढे कष्ट केले आहेत आणि अजूनही करत आहेत ते कोणी करू शकत नाही. यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो यशस्वी आहे. तसेच प्रत्येक मुलाखतीत तो ज्या पद्धतीने बोलतो ते पाहून मला प्रेरणा मिळते. तुमची वृत्तीच तुम्हाला कुठेतरी घेऊन जाते. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच तो एक महान माणूस देखील आहे,” असेही हरनाझने स्पष्ट केले.