India set to host Miss World 2023 : जगप्रसिद्ध मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन यंदा भारतात करण्यात येणार आहे. या निमित्ताने तब्बल २७ वर्षांनी भारताला पुन्हा एकदा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे. यापूर्वी १९९६ मध्ये भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यंदा ही सौंदर्य स्पर्धा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : “नट्टू काका सेटवर अनेकदा रडले” जेनिफर मिस्त्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “एक सुट्टी मागितल्यावर…”
७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात येईल, अशी घोषणा मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्युलिया मोर्ले यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्युलिया मोर्ले म्हणाल्या, “७१ व्या मिस वर्ल्डसाठी स्पर्धेसाठी भारताची निवड करताना मला अत्यंत आनंद होत आहे. येथील वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक वारसा स्थळे याची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
“७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही एक महिना संपूर्ण देशभरातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहोत. जवळपास एक महिना सुरु राहणाऱ्या या कार्यक्रमात १३० हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत”, असे ज्युलिया मोर्ले यांनी सांगितले. सध्याची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्का सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होती.
दरम्यान, भारताने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब तब्बल सहा वेळा जिंकला असून आतापर्यंत रिटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) आणि मानुषी छिल्लर ( २०१७) या सौंदर्यवतींनी ‘मिस वर्ल्ड’ होण्याचा बहुमान मिळवला आहे.