मिस वर्ल्ड २०२५(Miss World 2025) ही स्पर्धा या वर्षी तेलंगणात पार पडणार आहे. त्याची सध्या तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता ही स्पर्धा नेमकी कधी पार पडणार आहे? या स्पर्धेचे वेळापत्रक काय आहे? त्याबरोबरच या स्पर्धेत भारताचे कोण प्रतिनिधित्व करणार आहे, याबद्दल अधिक जाणून घेऊ. मिस वर्ल्ड या स्पर्धेसाठी ६ व ७ मे रोजी जगभरातून स्पर्धक हैदराबादमध्ये येणार आहेत. त्यानंतर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचा प्रीमियर सोहळा पार पडणार आहे. तेलंगणा टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी हायटेक्स येथे ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार आहे. त्याआधी अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत.

‘मिस वर्ल्ड २०२५’चे वेळापत्रक

१४० देशांतील स्पर्धकांचे आगमन झाल्यानंतर १० मे ला गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन समारंभात पारंपरिक लोक आणि आदिवासी नृत्य सादर करण्यात येणार आहे. १२ व १३ मे रोजी ‘मिस वर्ल्ड २०२५’मधील स्पर्धक नागार्जुन सागर आणि हैदराबाद हेरिटेज वॉक येथे बौद्ध थीम पार्क येथील बुद्धवनमचा आध्यात्मिक दौरा करतील. १४ मे रोजी स्पर्धक काकतिया हेरिटेज ट्रिपचा अनुभव घेतील. त्यानंतर हे स्पर्धक रामप्पा मंदिराला भेट देतील. या मंदिराचा युनेस्को वारसा स्थळामध्ये समावेश आहे. त्याबरोबरच त्याच दिवशी ते वारंगलमधील कालोजी क्षेत्रम येथील शाळेतील मुले व इतर समुदायांशी संवाद साधतील.

१५ मे रोजी मिस वर्ल्ड २०२५ मधील स्पर्धक यदगिरिगुत्ता मंदिराला भेट देतील आणि पोचमपल्ली येथील हातमागाच्या केंद्रांना भेट देण्यासाठी जाणार आहेत. १६ मे रोजी ते हैदराबादमधील एआयजी, अपोलो व यशोदा या रुग्णालयांना भेट देतील. १७ मे रोजी गाचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये मिस वर्ल्ड स्पोर्ट्स फिनाले होणार आहे. १७ मे रोजी एक्स्पेरियम इको टुरिझम पार्कमध्ये खाद्य महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

१९ मे रोजी राज्य सचिवालय परिसर, टँक बंधारा, आंबेडकर पुतळा आणि तेलंगणा पोलिस इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा दौरा होईल. २० व २१ मे रोजी, टी-हब कॉन्टिनेंटल फिनालेचे आयोजन करण्यात येणार आहे. जेव्हा स्पर्धकांना कॉन्टिनेंटल क्लस्टर्सच्या आधारे सुव्यवस्थित केले जाईल. २१ मे रोजी स्पर्धक शिल्पारम येथे कला आणि हस्तकला सत्रात भाग घेतील.

मिस वर्ल्ड २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार?

राजस्थानमधील कोटा येथील नंदिनी शर्मा ७२ व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस वर्ल्ड २०२४ क्रिस्टीना पिस्जकोवा यंदाच्या विजेत्या स्पर्धकाला मुकुट घालणार आहे. ३१ मे रोजी हायटेक्स येथे मिस वर्ल्ड २०२५ चे कार्यक्रम पार पडणार आहेत. २ जून रोजी विजेती स्पर्धक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेईल.