एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या हरयाणाच्या मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आणि तेव्हापासून तिच्याच नावाच्या चर्चा सुरु झाल्या. जवळपास १७ वर्षांनंतर मानुषीने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले असून, तिच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या मानुषी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून, माध्यमांच्या प्रश्नांना तितक्याच चांगल्या पद्धतीने उत्तरे देत आहे. ‘पद्मावती’ वाद, पाकिस्तानमधून होणारी टीका, बॉलिवूड पदार्पण, खाप पंचायतीचा निर्णय या सर्व मुद्द्यावर मानुषीने तिच्या मुलाखतीदरम्यान उत्तरे दिली. पण, ज्या प्रश्नाची अपेक्षा तिला होती तो विचारलाच जात नव्हता आणि जेव्हा तो प्रश्न विचारला गेला तेव्हा मात्र तिने या प्रश्नाचे उत्फूर्तपणे उत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टाईम्स’च्या मुलाखतीत मानुषीला तिच्या खासगी आयुष्याविषयी, साखरपुड्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याचेच उत्तर देत ती म्हणाली, ‘बऱ्याच लोकांनी माझ्या साखरपुड्याविषयीचे प्रश्न विचारले होते. किंबहुना कोणा एका मुलासोबत माझे नातेही जोडले गेले होते. त्यामुळे यासंबंधीचा प्रश्न मला मुलाखतींमध्ये विचारला जावा, अशी माझी अपेक्षा होती. कारण, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीतही त्या व्यक्तीविषयी नमूद करण्यात आलं आहे. हे खरंतर हास्यास्पद आहे. कारण, मलाही ती व्यक्ती कोण हेच ठाऊक नाहीये.’

मानुषीने अखेर तिच्या खासगी आयुष्यावरुन पडदा उचलला आहे. ‘मी अवघ्या २० वर्षांची आहे. माझा साखरपुडा वगैरे झालाय असे वाटते तरी का?’, असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्याशिवाय, ‘मला खरंतर त्या व्यक्तीला (होणाऱ्या काल्पनिक पतीला) भेटायचे आहे. कारण, त्याने माझ्या आईवडिलांचे काम अधिकच सोपे केले’, असे उपरोधिक वक्तव्यही तिने केले. सध्याच्या घडीला विविध प्रकारच्या प्रश्नांना मानुषी ज्या अंदाजात उत्तरे देत आहे, ते पाहता अनेकांनीच तिची प्रशंसाही केली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करत कलाविश्वात करिअर करण्याचा तिचा कोणताच विचार नसून, वैद्यकिय क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा मानस आहे.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss world manushi chhillar has been dying to answer this question about her engagement