मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली बांग्लादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू यांचा मृतदेह सोमवारी एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांचा मृतदेह पोलिसांना ढाकाच्या केरानीगंजमधील एका पुलाच्या जवळ सापडला. काही स्थानिक लोकांना सोमवारी अलीपूर पूलच्या जवळ दिसला होता. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. अभिनेत्रीची हत्या करून नंतर तिचा मृतदेह अशाप्रकारे पोत्यात भरून पूलाजवळ टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी याची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली होती. दरम्यान अभिनेत्री रायमा यांचा पती शखावत अली नोबल आणि त्याचा ड्रायव्हर यांना पोलिसांनी या संदर्भातील चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. रायमा यांच्या पतीनं रविवारी कलाबागान पोलीस ठाण्यात रायमा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. रायमा यांचा पती शखावत अली नोबलनं या हत्येमध्ये आपला हात असल्याचं पोलिसांकडे मान्य केलं. त्यानंतर पोलिसांनी शखावतला अटक करत ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबीक वादमुळे रायमा यांची हत्या करण्यात आल्याचं त्यांचा पती शखावत अली नोबल यांने पोलीस चौकशी दरम्यान कबुल केलं आहे. केरानीगंज पोलिसांनी रायमा यांचा पती शखावत अली नोबल आणि त्याचा मित्र अब्दुल्ला फरहाद यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पण बांग्लादेशी मीडिया रिपोर्टनुसार यामागे एखाद्या मोठ्या अभिनेत्याचा सहभाग असू शकतो. पण याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

रायमा इस्लाम शिमू त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. पण रविवारी सकाळी त्या बेपत्ता झाल्या त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या बेपत्ता असण्याची तक्रार दिली होती. ४५ वर्षीय रायमा यांनी १९९८ साली ‘बार्तामन’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी २५ चित्रपटांसह काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं.