दूरचित्रवाहिन्यांनी जसे सामान्यांच्या प्रश्नांना आणि समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलं, असंख्य विषयांवरील माहितीचा ओघ त्यांच्या घरात आणून सोडला, तसंच त्यांच्यामुळे अनेक अनिष्ट गोष्टीही त्यांच्या घरात राजरोसपणे शिरल्या आहेत. त्यांना प्रतिबंध करणं आता कुणाच्याच हाती उरलेलं नाही. ‘रिअॅलिटी शो’ नामक आसुरानं जसं गावोगावचं छुपं टॅलेन्ट उजेडात आणलं, तद्वत माणसांच्या खासगी गोष्टींचा चव्हाटाही मांडला. येनकेन प्रकारेण प्रसिद्धी, पैसा व ग्लॅमर मिळवण्याच्या खटाटोपात ज्यांना रस्त्यावरच्या कुत्र्यानंही कधी हुंगलं नसतं अशी माणसंही आज ‘सेलिब्रेटी’ बनली आहेत. अर्थात याचा दोष केवळ वाहिन्यांना वा या कथित सेलिब्रेटींनाच देऊन चालणार नाही. समाजही इतका बथ्थड आणि संवेदनाहीन झालेला आहे, की त्याला कशाचंच सोयरसुतक उरलेलं नाही. अन्यथा ही बजबजपुरी माजलीच नसती.
तर सांगायचा मुद्दा हा, की रिअॅलिटी शोज्नी आज माणसांचं आयुष्य व्यापलं आहे. काल्पनिक, रटाळ मालिका पाहण्यात त्यांना आता मजा येईनाशी झाली आहे. काहीतरी खमंग, चमचमीत पाहण्यासाठी त्यांच्या बुभुक्षित नजरा आसुसल्या आहेत. त्यातूनच हा रिअॅलिटी शोज्चा बाजार सध्या जोरावर आहे. कथित सेलिब्रेटींची लग्नं, त्यांची अफेअर्स, त्यातले भावनिक-मानसिक ताणतणाव, अत्याचार आणि या सगळ्याची होणारी परिणती मिटक्या मारत पाहणारे असल्यावर रिअॅलिटी शोज्च्या धंद्याला बरकत न येती तरच नवल. पोटार्थी कलाकारांनीही मग या बूममध्ये आपले हात धुऊन घेतले नाहीत तर त्यांच्यासारखे कपाळकरंटे तेच.
‘मिस्टर अॅण्ड मिसेस’मध्येही विकृत दर्शकांची भूक शमवण्यासाठी अशा तऱ्हेनेच सादर झालेला एक रिअॅलिटी शो दाखवला आहे. एकेकाळी ‘मोगरा फुलला’ मालिकेतून हिट् झालेला आणि नंतर ती हवा डोक्यात गेल्यानं केलेल्या माजोर्डेपणामुळे इंडस्ट्रीतून बाहेर फेकल्या गेलेल्या अमित जयंत नामक नटाला त्याचा प्रोडय़ुसर मित्र अश्विन एका सुपरहिट् होऊ शकणाऱ्या विषयावरील रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची ऑफर देतो. अमितच्या निष्क्रियतेमुळे आणि त्यातून त्याला आलेल्या वैफल्यग्रस्ततेमुळे त्याचं आणि बायको मीराची सतत भांडणं होत असतात. मीरा साधी-सरळ, बॅंकेत नोकरी करणारी स्त्री. तिच्या कमाईवरच घर चाललेलं. त्यामुळेच पुरुषी अहम्पायी अमित तिचा मानसिक छळ करतो. तरीही सोशिकपणे ती त्याला समजून घेत राहते. मात्र, हल्ली याचा कडेलोट होऊ लागलेला असतो. त्यांच्यातलं नातं सडत, कु जत चाललेलं असतं. ते आता एकदाचं संपवावं असा विचार अमितच्या मनात येत असतो.
आणि नेमक्या या मोक्यावरच अश्विन त्याच्याकडे एका रिअॅलिटी शोचा प्रस्ताव घेऊन येतो. विषय असतो : अमित-मीराचा समस्त दर्शकांसमोर होणारा खराखुरा घटस्फोट! विषय कळल्यावर प्रारंभी अमित काहीसा हडबडतोच. पण इतक्या वर्षांचा विजनवास संपवण्याची चालून आलेली ही सुवर्णसंधी आणि अश्विनने ‘पर डे
ठरल्यानुसार सगळी सज्जता होते. मीराला आपलं घर आपल्या अपरोक्ष आमूलाग्र बदलल्याचं पाहिल्यावर धक्काच बसतो. पण अमित तिला कसंबसं समजावतो. नवी सीरियल मिळाल्यानं पैसे मिळालेत आणि त्यातूनच घर चकाचक केल्याचं तो तिला सांगतो. तिचा खरं तर विश्वास बसत नाही त्यावर; परंतु अमित कशीबशी तिची समजूत पटवतो.
आणि नंतर सुरू होतो खेळ.. घटस्फोटाचा!
हा जरी ‘रिअॅलिटी शो’ असला तरी त्यातही सारं सुनिश्चित केलेलं असतं. त्यानुसार अमितला वागाय-बोलायला, नाटक करायला भाग पाडलं जातं. या ‘खेळा’त मीराला किंचितही संशय येऊ न देता सहभागी करून घेताना अमितची चांगलीच ससेहोलपट होते. त्यांचं खासगी आयुष्य तर संपलेलं असतंच. आता सगळंच जगणं ‘पब्लिक’ म्हणताना शोच्या गरजेनुसार अमितला वागावं लागतं. मीराबरोबरचे त्याचे खासगी क्षणही चित्रित करण्यापर्यंत चॅनलवाल्यांची मजल जाते तेव्हा कुठं अमितला आपण कसलं संकट ओढवून घेतलंय याची भीषण जाणीव होते. पण तोवर खूपच उशीर झालेला असतो. एकीकडे आपण जे करतोय त्याचा प्रचंड अपराधगंड आणि दुसरीकडे अडकलेपणातून आलेली हतबलता अशा दुहेरी कात्रीत मन:स्वास्थ्य हरपून अमित उद्ध्वस्त होत जातो..
लेखक अस्लम परवेझ व निलेश रुपापारा यांनी आजचं भयकारी वास्तव मांडणारं हे नाटक उत्कंठावर्धकरीत्या कळसाकडे नेलं आहे. रिअॅलिटी शोचं नागडं, क्रूर वास्तव मांडतानाच माणसाच्या अवास्तव आकांक्षांमुळे त्याचं जगणं कसं नरकवत बनतं याचं अंगावर काटा आणणारं दर्शन ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’मध्ये घडतं. ‘रिअॅलिटी शो’चा मसाला आणि तो बनवणाऱ्यांची धंदेवाईक कसाई वृत्ती वगैरे तपशीलही यथार्थपणे नाटकात आला आहे. एकीकडे अमित-मीराचं दुरावलेपण, त्यांच्यातले ताणतणाव, त्यातून निर्माण झालेला अंतराय- हा मसाला आयताच उपलब्ध असतानाही शो अधिक खमंग, चटकदार व्हावा म्हणून चॅनल व अश्विनकडून होणारी अमितची गळचेपी, त्यात भरडलं जाणारं अमित-मीराचं जगणं, मीराच्या काही कृतींमुळे शोच्या उद्देशावरच फिरणारं पाणी, त्या विक्षेपातून बाहेर येऊन शो पुन्हा रंगतदार करण्यासाठी अमितवर आणलं जाणारं दडपण, याचे त्याच्या वागण्या-जगण्यात उमटणारे पडसाद.. हे सारं अत्यंत वास्तवदर्शीपणे नाटकात येतं. मनोरंजन जगतातलं क्रूर वास्तव यानिमित्तानं अधोरेखित होतं. नाटकातील खटकणाऱ्या गोष्टीचाही उल्लेख करायला हवाच. नाटकात सुरुवातीच्या इस्टेट एजंटच्या प्रवेशाचं नेमकं प्रयोजन काय, हे कळत नाही. ना तशी परिस्थिती अमितवर ओढवलीय, ना त्यानं कुणा एजंटला जागा विकण्याकरता नेमलंय. असं असताना हा प्रवेश कशासाठी?
दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी प्रयोग अगदी काटेकोर, बंदिस्तपणे बसवला आहे. छुप्या कॅमेऱ्यांतून अमित-मीराच्या घरातील सर्व घटना टिपल्या जाताहेत, हे रंगमंचाच्या बाहेर लावलेल्या टीव्ही स्क्रीन्समधून दाखवलं गेलंय. त्यातून रिअॅलिटी शोची भयानकता सामोरी येते. रिअॅलिटी शोमधील क्रौर्य अधिक गडद करण्यात दिग्दर्शकानं कुठंच कसूर केलेली नाही. गंमत म्हणजे या पाश्र्वभूमीवर मीरानं काही वेळा तणावपूर्ण प्रसंगांत आपल्या थंड प्रतिक्रियेनं रिअॅलिटी शोवाल्यांच्या अपेक्षेवर टाकलेलं विरजण चांगलंच बोचरं ठरतं. नाटकातील पात्रांचा प्रवास, त्यांची व्यक्तिमत्त्वं, त्यांचं वागणं-बोलणं, वावरणं.. हे सगळं दिग्दर्शकानं विचारपूर्वक सुनिश्चित केलेलं आहे. विशेषत: अमितच्या ऱ्हासाचा आलेख, त्याची त्यातून होणारी तगमग आणि त्याचा विस्फोट दिग्दर्शकानं कडेलोटापाशी आणूनच केला आहे. प्रेक्षकांना क्षणभरही उसंत घेऊ न देण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांत प्रेक्षक गुंतत जातो. आणि तो भानावर येतो तेव्हा नाटक संपलेलं असतं.
प्रसाद वालावलकरांनी अमितचं घर आणि रिअॅलिटी शोला आवश्यक सेटसदृश्य घर यथातथ्य उभं केलं आहे. ऋषिकेश कामेरकरांनी आघाती संगीततुकडय़ांनी नाटय़गत ताण वाढवत नेला आहे. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेनं आवश्यक वातावरणनिर्मिती केली आहे. मीरा वेलणकर-अपर्णा गुराम (वेशभूषा) आणि संदीप नगरकर (रंगभूषा) यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे.
चिन्मय मांडलेकर यांनी रिअॅलिटी शोच्या विखारी सापळ्यात अडकलेल्या आणि प्रवाहपतित होत ऱ्हासाप्रत चाललेल्या अमितची ठसठसती वेदना, त्याची तगमग, त्याचं उद्ध्वस्त होत जाणं, मीराच्याच नव्हे तर स्वत:च्याही नजरेतून उतरणं.. क्रमश: टिपेला नेत सुंदर अभिव्यक्त केलं आहे. सूक्ष्म तपशीलही त्यांनी सहजगत्या भरले आहेत. प्रारंभीची नवऱ्याचे सारे अपराध पोटात घालणारी साधी-सरळ बायको.. ते त्याचं वाहवत जाणं ध्यानी आल्यावर त्याची चोख झाडाझडती घेऊन त्याच्या अपराधाचं माप त्याच्या पदरात घालणारी मीरा, मधुरा वेलणकर-साटम यांनी समजून-उमजून साकारली आहे. रिअॅलिटी शोला अपेक्षित संघर्षपूर्ण प्रसंगांतलं ‘नाटय़’ ओम्फस करतानाची त्यांची निरागसता लाजवाब. प्रियदर्शन जाधव यांनी शोचा पक्का धंदेवाईक निर्माता अश्विन त्याच्या थंड क्रूरतेसह यथार्थपणे साकारला आहे. अनिरुद्ध जोशी यांनी पुणेरी रोहन खासा वठवला आहे. यशश्री उपासनी (मॅगी/जसलीन), सुधीर श्रीधर (हसमुखभाय), हरीश कस्पटे (पोस्टमन), दीपश्री देवधर (रागिणी) व अमित नंदा (इन्स्पेक्टर) यांनी आपल्या छोटय़ा भूमिकाही लक्षवेधी केल्या आहेत.
‘मिस्टर अॅण्ड मिसेस’अंगावर काटा आणणारी ‘रिअॅलिटी’
दूरचित्रवाहिन्यांनी जसे सामान्यांच्या प्रश्नांना आणि समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलं, असंख्य विषयांवरील माहितीचा ओघ त्यांच्या घरात आणून सोडला, तसंच त्यांच्यामुळे अनेक अनिष्ट गोष्टीही त्यांच्या घरात राजरोसपणे शिरल्या आहेत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-02-2014 at 12:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mister and mistress reality marathi play