Mithilesh Chaturvedi Died : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) मिथिलेश चतुर्वेदी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून मिथिलेश हे हृदयरोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांना गेल्या अनेक वर्षांपासून हृदयासंबंधित आजारामुळे त्रस्त होते. यावर ते योग्य ते उपचारही घेत होते. यासाठी ते त्यांच्या मूळगावी लखनऊला स्थायिक झाले होते. मात्र काल ३ ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी त्यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

आशिष चतुर्वेदी यांनी फेसबुकवर त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याला कॅप्शन देताना ते म्हणाले, “तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता होता. तुम्ही मला जावई म्हणून नाही तर मुलाप्रमाणे प्रेम दिले. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.” त्यांच्या या पोस्टनंतर मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकार, सिनेसृष्टीतील मंडळी कमेंट करत श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

मिथिलेश चतुर्वेदी यांनी १९९७ मध्ये ‘भाई भाई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकले. यात ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.

या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली होती. लॉकडाऊन काळात २०२० मध्ये त्यांनी ओटीटीवरही काम केले होते. ते ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये झळकले होते. मिथिलेश चतुर्वेदी हे सध्या बनछडा नावाच्या चित्रपटात काम करत असल्याची बोललं जात आहे.