‘देवों के देव महादेव’ या ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील मालिकेत अरुणासूर नावाच्या महाभयंकर राक्षसाचा प्रवेश होणार आहे. पण, निर्मात्यांची अडचण अशी झाली आहे की या महाभयंकर, महापराक्रमी आणि महादुष्ट महाअसुराची भूमिका करण्यासाठी तितका दमदार अभिनय करणारा महाअभिनेताच त्यांना सापडत नाही आहे. त्यामुळे कुठलेही नवे चेहरे शोधण्याचे प्रयोग न करता चक्क बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यांना या भूमिकेसाठी साकडे घालण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ या दोघांनाही या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली असून जो पहिले होकार देईल तो अरुणासुर अशी लॉटरीवाली प्रक्रिया निर्मात्यांनी स्वीकारली आहे.
‘देवों के देव महादेव’ या मालिकेत मोहित रैना शंकराच्या भूमिकेत इतका दमदार वाटतो की त्याच्यापुढे असुरांच्या भूमिकेत कोणताही कलाकार घेऊन कथानक सादर करणे मालिकेच्या लोकप्रियतेसाठी धोकादायक ठरू शकते. आत्तापर्यंत सुदेश बेरी, मानव गोहिल, सुरेंद्र पाल असे अनेक जुने टीव्ही कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकांमध्ये भाव खाऊन गेलेत. पण, अरुणासुराच्या भूमिकेसाठी मात्र तितका चांगला अभिनेता निर्मात्यांना सापडत नाही आहे. अरूणासुराची भूमिका त्याच्या ‘लूक’सह आठवडय़ाभरात आत्मसात करून वठवू शकेल, अशा तोडीचा अभिनेता निर्मात्यांना हवा आहे. म्हणून त्यांनी या भूमिकेसाठी मिथून चक्रवर्तीआणि जॅकी श्र्रॉफ दोघांनाही विचारणा केली आहे. अरुणासुराच्या भूमिकेचे तपशील आणि पटकथाही त्या दोघांकडे पाठवण्यात आल्या असल्याचे वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले.
या दोघांच्या आधी अभिनेता डॅनी डेंग्झोपालाही या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. आता मिथून, जॅकी किंवा डॅनी यांच्यापैकी कोणी एकानेतरी या भूमिकेसाठी होकार द्यावा, अशा अपेक्षेत निर्माते आहेत. जॅकी आणि डॅनी या दोघांनाही छोटा पडदा नवा आहे. पण, मिथून चक्रवर्ती गेले काही वर्ष सातत्याने ‘डीआयडी’ रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पडत असल्याने त्यांच्यासाठी छोटा पडदा नवा नाही. वास्तवात, या तिघांपैकी कोणीही अरूणासुराच्या भूमिकेला होकार दिलाच तर छोटय़ा पडद्यावर मोठी धम्माल उडेल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा