गेल्या काही दिवसांपासून ट्रेलर आणि टीझर्समुळे चर्चेत असलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटातील ‘मिटुनी लोचने’ हे पहिले गाणे गुरूवारी प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात नाना पाटेकर हे ‘आप्पासाहेब बेलवलकर’ ही भूमिका साकारत आहेत. आप्पासाहेब बेलवकरांचे त्यांच्या नातीशी असणारे खेळकर नाते या गाण्यातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहे. मात्र, काही काळानंतर त्यांना नातीपासून दूर व्हावे लागल्यामुळे ‘एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरले आणि दुसऱ्या बाजुला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तुही आम्हाला विसरलास’, अशी कैफियत मांडणारे आप्पासाहेब बेलवलकर गाण्याच्या शेवटी दिसतात. गुरू ठाकूर याने लिहलेले हे गाणे अजित परब यांनी संगीतबद्ध केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी रंगभूमीवर अढळ स्थान असणारे ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या ‘नटसम्राट’ने मराठी नाटय़सृष्टीत एक अनोखी उंची गाठली होती. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावान कलाकारांच्या अभिनयाची जादू या नाटकाद्वारे पाहावयास मिळाली होती. ‘नटसम्राट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे. नाना पाटेकर यांव्यतिरीक्त रिमा लागू, विक्रम गोखले हे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. फिनक्राफ्ट मीडिया अ‍ॅण्ड एण्टरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एण्टरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित होईल.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mituni lochane song from natsamrat marathi movie