परळमधील दामोदर नाट्यगृह नुतनीकरणाच्या नावाखाली तोडण्यात येणार होतं. परंतु, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या नाट्यगृहाचे तोडकाम थांबवण्यात आले. मात्र, आता या प्रकरणात मनसेनेही ठोस भूमिका घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
परळ येथे ना म जोशी संकुलातील दामोदर नाट्यगृह पाडून त्या जमिनीचा पुनर्विकास करण्याचे प्रयत्न असून त्याला रंगकर्मींनी यापूर्वीच विरोध केला होता. मात्र तरीही सोशल सर्व्हीस लीगने या जागेचा पुर्नविकास करण्याचे ठरवले आहे. सहकारी मनोरंजन मंडळाने या पुनर्विकासाला विरोध केला आहे. आता मनसेनेही याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “गिरणगावातील दामोदर नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद आहे असा समज होता, पण खरं कारण आता लक्षात आलेलं आहे. ऐतिहासिक असं हे नाट्यगृह जमीनदोस्त करून तिथे सीबीएसई शाळा उभारण्याचा महापालिकेचा मनसुबा आहे. हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे” असं अमेय खोपकर म्हणाले.
हेही वाचा >> प्रशांत दामलेंची घोषणा, “दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी मराठी कलाकार रस्त्यावर उतरणार, वेळ पडल्यास..”
ते पुढे म्हणाले, “नाट्यगृहाचं आरक्षण हटवून शाळेच्या नावाखाली पैसे ओरबाडण्याचा महापालिकेचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कामगार चळवळीचं साक्षीदार असलेलं हे दामोदर नाट्यगृह तेवढ्याच दिमाखात उभं राहणारंच!”, असा इशाराही त्यांनी दिला.
गिरणगावातील दामोदर नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद आहे असा समज होता, पण खरं कारण आता लक्षात आलेलं आहे. ऐतिहासिक असं हे नाट्यगृह जमीनदोस्त करुन तिथे सीबीएसई शाळा उभारण्याचा महापालिकेचा मनसुबा आहे. हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. नाट्यगृहाचं…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 23, 2024
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेले दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या कामासाठी १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव सोशल सर्व्हिस लीगने केला असल्याचा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाने केला होता.
मुंबईच्या कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून १९२२ मध्ये दामोदर नाट्यगृहाची उभारणी केली. या नाट्यगृहात झालेले विविध नाटकांचे प्रयोग, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत अनेक रंगकर्मींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. कलाकारांचे हक्काचे स्थान असलेले दामोदर नाट्यगृह जमीनदोस्त करून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मनोरंजन सहकारी मंडळाने केला आहे. दामोदर नाट्यगृह पाडून त्याजागी बांधण्यात येणाऱ्या इमारतीत नाट्यगृह दिसणार नाही तोपर्यंत शासन परवानगी देणार नाही, असे शासनाने त्यांच्या निर्णयात स्पष्ट केले आहे.
ना. म. जोशी संकुलात नाट्यगृह, शाळा, मोकळे मैदान अशी वेगवेगळी आरक्षण आहेत. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या (बीआयटी) माध्यमातून सोशल सर्व्हिस लीग या संस्थेला भाडे कराराने दिली होती. दामोदर हॉलच्या जागेवर नाट्यगृहाचे आरक्षण आहे. नाट्यगृहाचा पुनर्विकास करण्याचा नावाखाली दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय पाडून त्या जागेवर सीबीएसई शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विकास आरखड्यातील नाट्यगृहाचे आरक्षण काढून शाळेचे आरक्षण टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.