मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम राजकारणी आणि उत्तम व्यंगचित्रकार आहेत. तसंच त्यांच्या भाषणाचा करीश्मा काय? हे देखील महाराष्ट्राने वारंवार पाहिलं आहे. राज ठाकरेंचं चित्रपट प्रेमही सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत ‘शक्ती’ या गाजलेल्या चित्रपटातील एका प्रसंगाचं उदाहरण दिलं आहे. त्यावरुन ते किती बारकाईने चित्रपट पाहतात हे लक्षात येतं. तसंच गांधी या सिनेमाचा किस्साही त्यांनी सांगितला आहे.

अमिताभ आणि दिलीप कुमार यांचा गाजलेला सिनेमा शक्ती

शक्ती हा सलीम-जावेद यांनी लिहिलेला सिनेमा आहे. जो रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केला होता. १९८२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन हे या सिनेमातले मुख्य कलाकार होते. या दोघांच्या अभिनयाची जुगलंबदी चित्रपटात पाहण्यास मिळाली होती.

गांधी सिनेमासारखा दुसरा बायोपिक का होऊ शकला नाही?

“गांधी हा सिनेमा बायोपिकच्या जगतातला उत्कृष्ट सिनेमा आहे. याचं कारण इंदिरा गांधी होत्या. कारण इंदिरा गांधींनी रिचर्ज अॅटनबॉरोंना शूटिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चित्रिकरणाची मुभा दिली. राष्ट्रपती भवन तसंच इतर महत्त्वाच्या वास्तू या ठिकाणी त्यांना चित्रीकरण करता आलं. सगळी मोकळीक दिल्याने तो सिनेमा खूप मोठा झाला. चित्रपटाकडे पाहतानाचा राज्यकर्त्यांचा दृष्टीकोन संकुचित असून चालत नाही तो व्यापकच असला पाहिजे. माझा प्रपोगंडा इतक्यापुरती ती गोष्ट असून चालत नाही. गांधी हा सिनेमा असंख्यवेळा पाहिला आहे. कुठल्याही बायोपिक या सिनेमाच्या पुढे गेल्याच नाहीत. एखाद्या माणसाचं आयुष्य तीन तासांत दाखवायचं हे उत्तम जमलं आहे. आत्ता अशा प्रकारची बायोपिक करायची ठरवली तर ती फक्त इंदिरा गांधींची होऊ शकते बाकी कुणाचीही नाही. असं मत राज ठाकरेंनी ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

1982 Film Gandhi
गांधी या सिनेमातील एक प्रसंग

हे पण वाचा- राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”

सिनेमाचं वेड कुठून आलं?

राज ठाकरे म्हणाले, “फिल्म मेकिंगची आवड मला पहिल्यापासून होती. शोले सिनेमा खूप गाजला होता तेव्हाचा एक किस्सा सांगतो. लोक सांगायचे मी १० वेळा पाहिला, २० वेळा, २५ वेळा पाहिला. त्यावर आम्ही विचारयचो की का? समजला नाही? गंमतीचा भाग सोडा पण मी सिनेमा असंख्यवेळा पाहतो. वेगवेगळ्या अंगांनी पाहतो. एखादी गोष्ट दिग्दर्शकाला का सुचली? हे मी पाहात असतो.

शक्ती सिनेमाची आठवण

शक्ती नावाचा एक सिनेमा येऊन गेला. या सिनेमात अमिताभला अटक झालेली असते आणि त्याच्या आईला मारलेलं असतं. अमिताभचं आईवर प्रचंड प्रेम असतं. त्याचे वडील दिलीप कुमार आहेत. अमिताभ आणि दिलीप कुमार म्हणजे मुलगा आणि वडील यांच्यात द्वंद्व आहे. एक प्रकारचा संघर्ष आहे तरीही ते त्याचे वडील आहे. आई गेल्यानंतर अमिताभला घरी आणतात. तो सीन असा आहे की त्यात एकही संवाद नाही. पण दोनच गोष्टी आहेत. दिलीप कुमार खाली बसलेले असतात. आईचा मृतदेह समोर असतो. अमिताभ खाली बसतो त्याच्या डोळ्यांत पाणी आहे. तो ओक्साबोक्शी रडत नाही, फक्त वडिलांचा हात तो हातात धरतो. त्या हात धरण्यात वडिलांकडे दुःख व्यक्त करतो ना तसं दुःख व्यक्त करणं आहे त्यापुढे तो वडिलांचे हात आवळतो तो त्याचा राग आहे. चित्रपटातला प्रसंग पाहिल्यावर लक्षात येतं. एखाद्या सीनला जन्म देणं आणि तो तसा सादर होणं हे फार महत्त्वाचं आहे. दुःख आणि राग असे दोन्ही भाग त्यात आहेत. तिथून बाहेर पडल्यानंतर अमिताभ जीपमधून पळतो आणि आईच्या मारेकऱ्याच्या मागे जातो. सिनेमा हा आर्ट फॉर्म आहे जिथे तुम्हाला अनेक गोष्टी संवाद न साधता दाखवता येतात.” असं म्हणत राज ठाकरेंनी शक्ती सिनेमातला हा किस्सा सांगितला आहे.

Shakti Movie
शक्ती हा दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला सिनेमा आहे. आजही त्याची चर्चा होते.

लॉरेन्स ऑफ अरेबियातला आवडता प्रसंग

लॉरेन्स ऑफ अरेबियामधला माझा एक आवडता प्रसंग आहे. लॉरेन्स त्याच्या सीनियरला सिगारेट पेटवून देतो. त्यात सिगारेट संपली की चेहऱ्यासमोर धरुन विझवत असतो. या प्रसंगात तो ऑफिसर पेटलेल्या सिगारेटकडे पाहून फूंकर मारतो. तिथे कट आहे आणि सूर्योदय होताना दाखवला आहे पुढच्या फ्रेममध्ये. आता असं काही सुचणं हे का झालं असेल याचा विचार माझ्या मनात येत असतो. असंही राज ठाकरेंनी सांगितलं. या सगळ्या बारकाव्यांमधून राज ठाकरेंचं चित्रपट प्रेम कुठल्या उंचीवरचं आहे हे सहजपणे लक्षात येतं.

Story img Loader