पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘दी लिजेंड ऑफ मौला जट’ चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. १० वर्षांनंतर हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे. पण यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसंच थिएटर मालिकांना देखील ताकीद दिली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले? जाणून घ्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर ‘दी लिजेंड ऑफ मौला जट’ चित्रपटासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा ‘दी लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे. पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरू आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.

हेही वाचा – श्रुती मराठेच्या मालिकेने अवघ्या तीन महिन्यांत घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला, “अत्यंत वेदनादायी…”

पुढे राज ठाकरेंनी लिहिलं, “अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.”

“हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे,” असं लिहित राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे इशारा दिला आहे.

हेही वाचा – Video: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा

दरम्यान, २०२२मध्ये ‘दी लिजेंड ऑफ मौला जट’ या पाकिस्तानी चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. भारत सोडून सर्व देशांमध्ये फवाद खानचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाकिस्तानमध्ये या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. तर जगभरात २०० कोटींहून अधिक व्यवसाय केला होता