महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी मनसेच्या नवीन पक्षगीताचे लोकार्पण करण्यात आले. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तने हे गाणं गायलं आहे. नुकतंच त्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे.
अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर मनसेच्या नवीन पक्षगीताचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आई एकविरेच्या कृपेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या समक्ष काल मनसेचे नवीन पक्षगीत लोकार्पित झाले. ह्याआधी मनसे साठी मी केलेल्या ‘तुमच्या राजाला साथ द्या..‘ ह्या गीताला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले! परंतु, ह्यावेळेस मात्र माझी भूमिका केवळ गायकापुरतीच मर्यादित आहे”, असे अवधूत गुप्तने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
आणखी वाचा : “टायगर अभी जिंदा हैं!” मुंबई मनपा निवडणुकीआधी मनसेचं नवं स्फूर्तीगीत, पाहा टीझर
मनसेचे नवीन पक्षगीत हे ५ मिनिटांचे आहे. “प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…” असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्याची सुरुवात राज ठाकरेंच्या आवाजाने होते. यात राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराज, तुळजाभवानी देवी यांसह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याबरोबर या गाण्यात राज ठाकरेंचेही वर्णनही करण्यात आले आहे.
आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला
दरम्यान मंदार चोळकर याने हे गाणं लिहिले आहे. तर संगीतकार हितेश मोडक याने हे गाणं संगीतबद्ध केले आहे. तर अमेय खोपकर यांचा मुलगा ईशान खोपकर याने या गाण्याचे संकलन आणि निर्मिती केली आहे.