सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. असं असतानाच आता चित्रपटाचे अनेक ठिकाणी मोफत शो आयोजित केले जात आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहण्याचा मोठा निर्णय घेतलाय. यासाठीच या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्याचं राज ठाकरेंच्या मनसेनं ठरवलं आहे.
नक्की वाचा >> संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी, कारण ठरला The Kashmir Files; भाजपा झाली आक्रमक
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. कश्मीर फाइल्स या हॅशटॅगसहीत संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. २४ मार्च २०२२ मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल. जे. रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे,” असं या फोटोमध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’साठी…”; विवेक अग्निहोत्रींचा मोठा खुलासा
त्याचप्रमाणे मनसेतर्फे दाखवण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या शोची मोफत तिकीटं दादरमधील हेदक्करवाडीतील मनसेच्या शाखेमध्ये उपलब्ध असतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तसेच या तिकीटांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही संदीप देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हटलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिल्यांदाच अशाप्रकारे उघडपणे या चर्चेतील चित्रपटासंदर्भात भूमिका घेतलीय.