एकीकडे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे हे दोन्ही देश आमने-सामने येणार असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना सज्जड दम दिलाय. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसले तर खळ्ळखट्याक केला जाईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. आज ट्वीट करून त्यांनी ही सुचना वजा धमकी भारतीय चित्रपट आणि मालिका निर्मात्यांना दिली आहे.
पाकिस्तानी कलाकारांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच रान उठवलं आहे. पाकिस्तानी कलाकार कोणत्याही भारतीय कलाकृतीत दिसला की मनसेने संबंधित निर्मात्यांविरोधात नेहमीच खळ्ळखट्याक केला आहे. आता पुन्हा मनसेने हा मुद्दा छेडला असून भारतीय निर्मात्यांना सज्जड दम दिला आहे.
“पाकिस्तानने नेहमीच भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आहे. काही लोक ही घृणास्पद कृत्ये विसरली असतील, पण आम्ही नाही”, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
ते पुढे म्हणतात की, “लक्षात ठेवा, आम्ही नेहमीच पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांच्या विरोधात भूमिका घेतो आणि घेत राहू. जर कोणताही पाकिस्तानी अभिनेता भारतीय चित्रपट किंवा मालिकेत कोणीतीही भूमिका साकारत असल्याचे आढळले तर आम्ही त्यांना निश्चितच फटकारतो. अशा कृतींसाठी अशा चित्रपटांचे किंवा मालिकांचे निर्माते जबाबदार असतील.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर नेहमीच चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात. मराठी कलाकारांना ते सतत पाठिंबा देतात. चित्रपटांना प्राईम टाईम मिळवून देण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी अनेक कलाकार अमेय खोपकर यांची मदत घेतात. त्यामुळे सिनेसृष्टीत अमेय खोपकरांचा चांगलाच दरारा आहे. दरम्यान, अमेय खोपकऱ्यांच्या या इशाऱ्यावर आता सिनेसृष्टीतून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागणार आहे.