लोकवस्तीच्या परिसरात भरमसाठ मोबाइल टॉवर उभारण्याविरोधात चळवळ आणि जनजागृती मोहीम राबवल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने मोबाइल फोनच्या सुरक्षित वापराचा मुद्दा हाती घेतला आहे. मोबाइल फोनमधून बाहेर पडणाऱ्या लहरींमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ते टाळण्यासाठी हा फोन वापरण्याबद्दलच्या सूचना आणि धोक्याचा इशारा मोबाइल फोनच्या बॉक्ससह द्यायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोबाइल फोनचा वापर आजच्या काळात अपरिहार्य आहे. त्यामुळे लोकांनी मोबाइल वापरूच नये वा त्याचे टॉवर असू नयेत, असे कोणी म्हणू शकणार नाही. मात्र फोन वापरताना आणि टॉवर बांधताना लोकांच्या आरोग्याला हानी होणार नाही याचा विचार आवश्यक आहे, असे सांगत मोबाईल वापरताना काळजी घ्या, असे आवाहन जुहीने केले. तर मोबाइल फोन हा आरोग्याला हानीकारक नसेल तर ‘शक्यतो लँडलाइन’चा वापर करा, असे दूरसंचार विभाग आपल्या जाहिरातीत का म्हणतो? असा सवाल जुहीचे चळवळीतील सहकारी प्रकाश मुन्शी यांनी केला.
मोबाइल फोनची सुरुवात झाली तेव्हा त्यांचा वापर अल्प होता. वापरणाऱ्यांची संख्याही खूप कमी होती. पण आता दोन्हीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे मोबाइल फोन आणि टॉवरमधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचे वातावरणातील प्रमाण खूप वाढले आहे. त्यातूनच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ने मे २०११ मध्ये ‘मोबाइल फोन वा टॉवरमधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे कर्करोग होऊ शकतो’ असा अहवाल दिला होता याकडेही जुहीने लक्ष वेधले.
मुंबईतील जवळपास निम्मे मोबाईल टॉवर हे अनधिकृत आहेत हे खुद्द महानगरपालिकाच मान्य करते. मग ते काढण्याची कारवाई करण्यासाठी उपाययोजना का नाही करत, असा उद्विग्न सवालही जुहीने केला.
स्पॉट फिक्सिंग आश्चर्यकारक
‘आयपीएल’मधील स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण आश्चर्यकारक आहे. क्रिकेटपटूंनी केवळ चांगला खेळ केला तरी त्यांना खूप पैसे मिळतील. श्रीशांतसारख्या गुणी खेळाडूची कारकीर्द अशा रितीने संपणे हे खूपच वाईट आहे, अशी प्रतिक्रिया ‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या मालकीत भागीदारी असलेल्या जुही चावलाने दिली आहे. पैशासाठी असा आडमार्गाचा वापर केला की काय परिणाम होऊ शकतो हे या निमित्ताने समोर आले आहे. क्रिकेपटूंनी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे. त्यातील यशाने त्यांना चांगला पैसा मिळेल. या प्रकरणात झालेली कारवाई पाहूनच आता बाकी खेळाडू सावध होतील व कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, असे जुहीने नमूद केले.

जुहीचे आवाहन
* लहान मुलांच्या चेहऱ्याची हाडे नाजूक असतात. मोबाइलच्या लहरींमुळे त्यांना जास्त त्रास होतो. त्यामुळे मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा, ते खेळायला देऊ नका.
*  मोबाइल वरच्या खिशात ठेवू नका.  वापरात नसताना आपल्यापासून शक्य तितका दूर ठेवा.
*  कानाला लावून बोलू नका, थोडे अंतर ठेवा.
*  लिफ्ट वा बंद कारमध्ये मोबाइलवर बोलू नका, अशावेळी लहरी तीव्र होतात.